पंकज कुमावत यांचा परळीतील गुटखा विक्रेत्यांना दणका
चार जणांवर गुन्हा दाखल; एक आरोपी ताब्यात तिघे फरार

परळी : येथे किराणा दुकानातून राज्यात बंदी असलेला गुटखा व पान मसाला विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने दोन ठिकाणी छापा मारुन विविध कंपनीचा गुटखा व सुगंधित तंबाखू असा एकूण २ लाख ११ हजार ८५३ रु. मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. तिघे पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
राज्यात बंदी असूनही सर्वत्र गुटखा उघडपणे विकला जातो आहे. यावर केज येथील प्रशिक्षणार्थी म्हणून असलेले एएसपी पंकज कुमावत यांनी लक्ष केंद्रीत करून अनेक गुटखा विक्रेत्यांच्या विरोधात छापा सत्र सुरू करुन सळो की,पळो केले आहे. तरीही गुटखा विक्री सुरुच असून, परळी येथे दोन ठिकाणी विक्रीसाठी गुटख्याचा साठा करण्यात आल्याची माहिती एएसपी पंकज कुमावत यांना मिळाली होती. माहिती मिळताच चौकशी करुन खबर खरी असल्याची खात्री पटताच कुमावत यांनी त्यांच्या पथकास कारवाईचे आदेश दिले. यावरून परळी शहरातील राघव इन्टरप्रायजेस ( सुभाष चौक ) या लाहोटी राधेश्याम मुरलीधर यांच्या दुकानात छापा मारला असता येथे आरएमडी, बाबा, गोवा, राजनिवास, सुगंधित तंबाखू सह आदि बंदी असलेला ८० हजार ९४३ रु. साठा मिळून आला. तेसेच दुसऱ्या ठिकाणी विद्यानगर भागातील बुरांडे वैभव यांच्या घरी छापा मारला असता येथेही बंदी असलेला विविध कंपनीचा गुटखा व सुगंधित तंबाखू असा एकूण १ लाख ३० हजार ९१० रु. मुद्देमाल जप्त केला. असा वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापा मारुन २ लाख ११ हजार८५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरील कारवाई शनिवारी ( दि. २६ ) सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान करण्यात आली. या प्रकरणी फौजदार संतोष भालेराव व नाईक गित्ते दिलीप यांच्या फिर्यादीवरून संभाजी नगर व शहर पोलीस ठाण्यात चौघां विरोधात वेगवेगळे दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. यातील एक आरोपी ताब्यात घेतला आहे. सदरील कामगिरी फौजदार संतोष भालेराव, गित्ते दिलीप, वंजारे राजु, मंदे अनिल, पवार यांनी केली.