केज तालुक्यातील या… गावातील दिवाळीच्या तोंडावर घरातील पीठ आणि पाणीही संपलं?

लोकगर्जनान्यूज
केज : दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असताना तालुक्यातील सोनिजवळा येथील गावठाण रोहित्र ( डीपी) जळाला आहे. यामुळे गावात आठ दिवसांपासून अंधार आहे. गावातील गिरण्या बंद असल्याने घरातील पीठ , वीजे अभावी पाणी संपलं आहे. यामुळे ग्रामस्थांना बाहेरुन दळण आणि पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सह विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यामुळे महावितरण कंपनीच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
वर्षातील सर्वात मोठा आणि प्रकाशाचा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. यादिवशी खूप प्रकाश व दीप लावून आनंदात दिवाळी साजरी करण्यात येते. पण यावर्षी सोनिजवळा ( ता. केज ) येथील ग्रामस्थांची दिवाळी अंधारात जाणार का? असे चित्र निर्माण झाले. कारण येथील गावठाण विद्युत रोहित्र ( डीपी ) जळाला आहे. याला तब्बल आठ दिवस झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. तसेच मागील आठवडाभरापासून गाव अंधारात चाचपडत असून, याकडे कोणाचेच लक्ष नाही. गावात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रानोमाळ भटकंती करून पाणी आणावं लागतं आहे. गावातील पिठाच्या गिरण्या बंद असल्याने घरातील पीठ संपलं आहे. तसेच सर्वच विद्युत उपकरणे बंद आहेत. यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने ग्रामस्थ महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे लोकगर्जनान्यूजशी बोलताना सांगितले आहे.