केज-मांजरसुंबा रस्त्यावर रोड रॉबरी:कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम लुटली

लोकगर्जना न्यूज
केज : पुणे येथे चाललेल्या वाहनाला अडवून सहा जणांनी कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम व महिलांच्या अंगावरील दागिने असा एकूण ७२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना मंगळवारी ( दि. २७ ) पहाटे ४ वाजता केज-मांरसुंबा रस्त्यावर कोरेगाव पाटी जवळ घडली आहे. हे लुटारू काळ्या कपड्याने तोंड बांधून आले होते. याप्रकरणी सहा अज्ञात आरोपीच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, धनाजी किसनराव भोसले हे पुणे जिल्ह्यातील कुरुळी ( ता. खेड ) येथे स्थायिक आहेत. चुलत्याचे निधन झाल्याने ते कुटुंब व इतर नातेवाईकांसह अंत्यविधीसाठी खतगाव ( जि. नांदेड ) येथे आले होते. रक्षा सावडण्याचा विधी उरकून परत पुणे येथे पिकअप क्रमांक एम.एच. १२ टी व्ही ३९०५ जात होते. दरम्यान केज-मांजरसुंबा महामार्गावर कोरेगाव पाटी जवळ असताना पाठीमागून एक कार आली. त्याने ओव्हरटेक करुन पिकअपला आडवी लावली. आतून काळ्या कपड्याने तोंड बांधलेले सहाजण उतरले त्यांच्या हातात धारदार कोयते होते. या कोयत्याच्या मुठीने एकास मारहाण करून दहशत निर्माण केली. पिकअपची चावी काढून घेतली व नंतर धमकी देत धनाजी भोसले व शंकर भोसले यांच्या जवळील ८ हजार ३७० रोख रक्कम तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम, पॅनकार्ड, आधार, क्रेडिट कार्ड असे साहित्य जबरदस्तीने काढून घेतले. यानंतर महिलांकडे मोर्चा वळवून दोन महिलांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने एकीचे ३६ हजार तर दुसऱ्या महिलेचे ८ हजार किंमतीचे दागिने ओरबाडून घेतले. असा एकूण ७२ हजार ३७० रु. ऐवज घेऊन लुटारू पसार झाले. ते पुन्हा परत कार वळवून केजच्या दिशेने गेले. यावेळी पिकअप मध्ये धनाजी भोसले, दत्ता भोसले, शंकर भोसले, शंकर यादव, समर्थ यादव, माधव टेकाळे, राम नखाते, विमलबाई घाटके, अनुसया भोसले, अंबिका परशुराम यादव हे प्रवास करत होते. अचानक घडलेल्या घटनेने सर्वच घाबरून गेले होते. स्वतःला सावरत त्यांनी केज पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास केज पोलीस करीत आहेत.