एसपी पंकज कुमावत यांची मोठी कारवाई; चंदन तस्कर टोळी जेरबंद

केज : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा कारवाईचा जिल्ह्यात धडाका सुरू असून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आजही गेवराई तालुक्यात चंदन तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करुन जवळपास आठ लाखांचा चंदनाचा गाभा तसेच दुचाकी, मोबाईलसह आदी ९ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. २० आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन १७ जणांना ताब्यात घेतले तर, तिघे फरार आहेत.
गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील विष्णू साहेबराव बांगर हा बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी टोळी करुन चंदनाची झाडे तोडून स्वतःच्या मोरवड नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात पत्र्याचे शेडमध्ये चंदनाची लाकडे व त्यातील गाभा काढून तो पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून पत्र्याच्या शेडमध्ये ठेवला आहे. अशी माहिती एएसपी पंकज कुमावात यांना गुरुवारी ( दि. २० ) मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज कुमावत यांनी केज येथील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन उक्कड पिंपरी ( ता. गेवराई ) आज ( दि. २१ ) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास छापा मारला. यावेळी १७ इसम जागीच मिळून आले. पत्र्याच्या शेडची व परिसराची पंचा समक्ष झडती घेतली असता पांढऱ्या १६ पोत्यामध्ये ३२८ किलो चंदनाचा गाभा ज्याची किंमत ७ लाख ८७ हजार रुपये, ४ दुचाकी, एक मोबाईल, चंदन तोडण्यासाठी व तासण्यासाठी लागणारे कुदळ, कुऱ्हाड, किकरे, वाकस हे साहित्य असा एकूण ९ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष मिसळ यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात २० आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. यातील १७ जण जागीच जेरबंद केले असून तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष मिसळे, सहाय्यक फौजदार शफी इनामदार, पोलीस हे.कॉ. बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक राजू वंजारे, महादेव सातपुते, संजय टूले यांनी केली. पंकज कुमावत आल्या पासून त्यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. या कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एक अधिकारी काय करु शकतो हे कुमावत यांनी कामातून दाखवून दिले आहे. अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.