UPSC-युपीएससी परीक्षेत बीडच्या लेकीच्या देशात डंका
चौथा क्रमांक पटकावून रोवला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : येथील अनुष्का लोहिया हीने युपीएससी ( UPSC ) च्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस परिक्षेत देशातून चौथा क्रमांक पटकावला आहे. या यशाने बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, बीड जिल्ह्याची मान देशात उंचावली आहे. याबद्दल अनुष्काचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बीड जिल्हा म्हटले की, लोकं नाकं मुरडतात तर हा जिल्हा म्हणजे ऊसतोड मजुरांचा जिल्हा, तसेच बालविवाह व मागील एका डॉक्टर मुळे मुलींना पोटात मारणारा जिल्हा असा काळा डाग पडला आहे. परंतु याच जिल्ह्याच्या लेकींनी नाक मुरडणाऱ्यांना कृतीतून सडेतोड उत्तर दिले असून, MPSC परीक्षेत सोनाली मात्रे ही राज्यात मुलींमध्ये प्रथम आली तर सीमा शेख ही वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग १ या mpsc परिक्षेत मुलींमध्ये राज्यातून प्रथम आली. यानंतर आता अनुष्का लोहिया ही युपीएससी ( UPSC ) परीक्षेत देशातून चौथा क्रमांक पटकावून बीड जिल्ह्याची मान देशात उंचावली आहे. अनुष्का लोहिया ही अंबाजोगाईच्या -हदयरोग तज्ञ डॉ. शुभदा आणि प्रा. अभिजित लोहिया यांची मुलगी आहे. अनुष्का अभिजीत लोहिया हीने बी.ई. सिव्हिल ( BE Civil ) सर करुन आपलं लक्ष्य युपीएससी ( UPSC ) कडे केंद्रीत केले. यासाठी जिद्द, चिकाटीने अभ्यास केला. यामध्ये मन रमाव म्हणून आवडीचा वन हे क्षेत्र निवडलं. युपीएससी ( UPSC ) अंतर्गत घेण्यात येणारी परीक्षा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल लागला असून यात अनुष्काने देशातून चौथा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.