तरनळी ते काळूचीवाडी रस्त्याची दुरवस्था; गरोदर माता व रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी घ्यावा लागतो बाजेचा आधार

केज : तालुक्यातील तरणळी ते काळूचीवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असून केवळ अवशेष शिल्लक राहिले आहे. त्यामुळे कोणतेही वाहन चालत नसल्याने ग्रामस्थांना आजही पायपीट करावी लागते. तसेच जर कोणी आजारी पडलं अथवा गरोदर मातेला प्रसुतीसाठी दवाखान्यात घेऊन जायचे असेल तर पाठीवर किंवा बाजेवर टाकून डोंगर चढून आणावं लागतं आहे. परंतु याकडे कोणाचेच लक्ष नसून केवळ निवडणुकीच्या तोंडावर पुढारी खोटी आश्वासने देतात. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला असून ते येत्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचारात असल्याचे सांगितले जात आहे.
तरनळी व काळूचीवाडी या दोन गावांना ग्रुप ग्रामपंचायत आहे. तरनळी पासून अंदाजे ५ की. मी. अंतरावर असलेल्या काळूचीवाडीची लोकसंख्या ५०० च्या आसपास आहे. नागरिकांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी रस्ता हा डोंगरदऱ्यातून जाणारा आहे. काळूचीवाडी येथील नागरीकांना प्रशासन व लोकप्रतिनिधी हे फक्त निवडणूक काळातच भेट देतात. एकदा का निवडणूक झाली की, या वाडीतील नागरिकांना भेटायला कोणी ही येत नाही. त्यामुळे या रस्त्याकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याने हा रस्ता आज पर्यंत उपेक्षितच राहीला आहे. या रस्त्याची एवढी दुरावस्था आहे की, एखाद्या वयोवृद्ध माणूस अथवा महीला आजारी पडली तर उपचारासाठी जाण्यासाठी किंवा गरोदर मातेला प्रसूती करिता दवाखान्यात पाठवायचे असेल तर येथील नागरिकांना प्रश्न पडतो की, या आजारी व्यक्ती व महीलांना दवाखान्यात कसे घेऊन जायचे? अनेक वेळा नागरिकांनी आजारी नातेवाईकांना येथून आपल्या पाठीवर घेऊन डोंगरपार करून घुले वस्ती पर्यंत आणुन तेथून पुढे वाहनाद्वारे दवाखान्या पर्यंत घेवून जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता तात्काळ करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर रस्त्याचे काम नाही झाले तर यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात येथील ग्रामस्थ दिसत आहे.