बीडमध्ये बहीणीवर भावाकडून चाकू हल्ला; भररस्त्यात प्रकार घडल्याने धावपळ उडाली

बीड : विधवा असलेली बहीण उद्या न्यायालयात दुसरा विवाह करणार आहे. आज रात्री भावाने चाकूने डोक्यात वार केले यामुळे बहीण गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी ( दि. २७ ) रात्री ८:३० च्या सुमारास डीपी रोड सारडा कॅपीटल समोर अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडली आहे. हा प्रकार पाहून कोणालाही काही समजत नसल्याने काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले तर धावपळ ही उडाली असे सांगितले जात आहे. माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने वातावरण निवळले प्रकार काय? हे समजले.
धनंजय दिपक बनसोड असे हल्ला करणाऱ्या भावाचे नाव आहे. विधवा असलेल्या बहीणीचे लग्न ठरले असून त्यासाठी ती होणारा पती योगेश बागडे यांच्या सोबत खरेदीसाठी आलेली होती. परंतु या लग्नाला धनंजय बनसोडेचा विरोध असल्याने तो साथीदारांसोबत आला आणि डिपी रोड वरील सारडा कॅपीटल समोर बहीणीवर चाकूने हल्ला केला. यामध्ये योगेश बागडे हे ही जखमी झाले. हा परिसर व रस्ता सायंकाळच्या वेळी माणसांनी फुलून जातो अशा अतिशय वर्दळीच्या ठिकाणी चाकू हल्ला होत असल्याचे पाहून काहीशी धावपळ उडाली तसेच तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु काही जागरूक नागरिकांनी बीड शहर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पो.नि. रवि सानप यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. प्रथम जखमींना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल केले. या घटनेने मात्र शहरात खळबळ उडाली आहे.