केज तालुक्यातील हृदयद्रावक घटना! चहा करताना लुगडं पेटल्याने जळालेल्या वृध्द महिलेचा मृत्यू

लोकगर्जनान्यूज
केज : चहा करताना लुगड्याने पेट घेतल्याने ९० वर्षीय महिला जळाल्याने गंभीर जखमी झाली. या वृद्धेचा अखेर उपचारादरम्यान दवाखान्यात मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सरुबाई विश्वनाथ बारगजे ( वय ९० वर्ष ) रा. टाकळी ( ता.केज ) असे मयत वृध्देचं नाव आहे. त्या चुलीवर चहा करत असताना. लुगड्याचा पदर जाळावर पडला काही क्षणातच लुगडं पेटल्याने सरुबाई गंभीररीत्या जळाल्या. नातेवाईकांनी आग विझवून त्यांना तातडीने केज येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथम उपचार करुन त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान सरुबाई विश्वनाथ बारगजे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नितीन सुंदरराव बारगजे यांच्या खबरेवरुन केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा अधिक तपास केज पोलीस करत आहेत.