
गेवराई : जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील महिला महाविद्यालयाची खेळाडू अंजना चव्हाण विद्यापीठाच्या रौप्यपदकाची मानकरी ठरली असून महाविद्यालयात तिचा सत्कार संपन्न झाला.
अंजना चव्हाणच्या या यशाबद्दल महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बापू घोक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेवराई येथील महिला महाविद्यालयाची खेळाडू अंजना चव्हाण हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘भाला फेक’ या क्रीडा प्रकारात तृतीय स्थान मिळवून रौप्यपदक पटकावले. त्यानिमित्ताने हा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अंजनाचे अभिनंदन करून प्राचार्य डॉ. कांचन परळीकर म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये ती चमकदार कामगिरी करील असा विश्वास होताच, तो तिने सार्थ ठरवला.
अंजना चव्हाण हिला प्रशिक्षक म्हणून महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रविण शिलेदार यांचे मार्गदर्शन लाभले असून यानिमित्ताने त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. कैलास सावंत यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. संदिपान किवने यांनी केले.
या यशाबद्दल अंजना चव्हाण हिचे जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक मा. राज्यमंत्री मा. श्री. शिवाजीराव ( दादा ) पंडित, अध्यक्ष मा. श्री. अमरसिंह पंडित, सचिव मा. श्री. जयसिंग पंडित, युवा नेते मा. श्री. विजयसिंह पंडित, युवा नेते मा. श्री. रणवीर पंडित, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर, उपप्राचार्य प्रा. बापू घोक्षे, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रमोद गोरकर, महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.