दुष्काळात तेरावा महिना! वीज कोसळून दोन म्हशी, एक बैल ठार:केज तालुक्यातील घटना

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यात शुक्रवारी सर्वत्र पाऊस झाला असून, पहाटे पासूनच पावसाला सुरुवात झाली. यादरम्यान तालुक्यातील पळसखेडा व पिराचीवाडी येथे वीज कोसळल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. एका घटनेत दोन म्हशी तर दुसऱ्या घटनेत एक बैल ठार झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आधीच पावसाने पीकांचे नुकसान त्यात हा आघात त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना नशीबी आले असल्याची चर्चा केली जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पळसखेडा ( ता. केज ) येथील शेतकरी मीरा महादेव पवार यांच्या शेतातील सालगडी शाहू मारुती पौळ रा. बोरी सावरगाव ( ता. केज ) यांच्या मालकीच्या दोन मूऱ्हा जातीच्या म्हशी चिंचेच्या झाडाखाली बांधलेल्या होत्या. शुक्रवारी ( दि. १४ ) दुपारी अडीच वाजता झाडावर अचानक वीज कोसळली यामध्ये दोन्ही म्हशी ठार झाल्या आहेत. जवळपास सालगड्याचे दीड लाखांचे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तलाठी विष्णू पटाईत व शेख फैजल यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दुसरी घटना पिराचीवाडी ( ता. केज ) येथे घडली आहे. शुक्रवारी ( दि. १४ ) पहाटे सतीश शामराव कराड यांच्या शेतातील जनावरे बांधलेल्या गोठ्यावर वीज कोसळली यामध्ये एक बैल ठार झाला. यामुळे सतीश कराड यांचे ७५ हजारांचे आर्थिक नुकसान झाले. मंडळाधिकारी डोरले आणि तलाठी बी.एस. तोगे यांनी पंचनामा केला. या नुकसान झालेल्या शेतकरी व सालगड्याला शासनाने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.