तुम्हाला माहितीये का? ‘तो’ भन्नाट भाषण करणारा मुलगा कुठला आहे: नसेल तर वाचा

लोकगर्जनान्यूज
बीड : सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा प्रजासत्ताक दिनी केलेलं भन्नाट भाषण अक्षरशः धुमाकूळ घालतोय. तो मुलगा कुठला आहे, कोणत्या वर्गात शिकतोय, या भाषणाची तयारी कोण करुन घेतली? याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या बातमीतून मिळतील त्यामुळे पुर्ण बातमी वाचावी लागेल.
सोशल मीडियावर सध्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील आयोजित कार्यक्रमात शालेय गणवेशात एक चिमुकला भाषण करतोय, भाषणाची सुरुवात तो गुरुजन आणि बाल मित्रांना गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देऊन करतो. आज लोकशाही दिवस असून आजपासून आपल्या देशात लोकशाही सुरू झाली. लोकशाही मला खूप आवडते…कारण … यामध्ये आपण काहीही करु शकतो. म्हणत मला खोड्या काढायला, दंगा मस्ती करायला, फिरायला , माकडा सारखं झाडावर चढायला खूप आवडते. पण काही बारीक पोरं माझं नाव वडीलांना व गुरुजींना सांगतात. माझे वडील मला मारत नाहीत,रागवत नाहीत ते लोकशाहीला मानणारे आहेत. परंतु गुरुजी लोकशाहीला पायदळी तुडवून मला मारतात, रागावतात असे हे भाषण आहे. या भाषणाने अख्खा महाराष्ट्राला वेड लावले असून, सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. प्रत्येकजण हा व्हिडिओ शेअर करत आहे. सर्वांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे हा मुलगा कुठला, कोणत्या शाळेत शिकतो? तर हा मुलगा आहे मराठवाड्यातील जालना जिल्ह्याचा त्याचे नाव कार्तिक ( भूऱ्या ) जालिंदर वजीर रा. रेवलगाव ( ता. अंबड ) कार्तिक हा रंगाने गोरापान असल्याने त्याचे मित्र त्याला भूऱ्या या टोपणनावाने ओळखतात. गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ( पहिलीच्या ) वर्गात शिकतो. खोडकर स्वभावासह शाळेच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतो. कबड्डी तर त्याचा आवडता खेळ असून तो यात सहभागी असतो. २६ जानेवारी रोजी शाळेत भाषण स्पर्धा ठेवण्यात आली होती. इतर मुले सहभागी होऊन भाषण करतात मग मी ही करणार म्हणून त्याने शिक्षक भारत मस्के यांनी त्यास परवानगी देऊन भाषण लिहून दिले. हे भाषण राज्यात फेमस झाले.
*कार्तिकच्या डोळ्यांची दृष्टी कमी
कार्तिक तल्लख बुद्धी असलेला हुशार विद्यार्थी आहे. परंतु त्याची दृष्टी कमी आहे. घराची परिस्थिती बिकट आहे. वडील शेतकरी आहेत. वर्गात मागे बसला तर फळ्यावरील काहीच दिसत नाही. त्यामुळे शिक्षक त्यास पहिल्या रांगेत फळ्या जवळ बसवतात. कार्तिकच्या दृष्टीचा विलाज होयला हवं असं मत त्याचे शिक्षक भारत मस्के यांनी व्यक्त केले.
*बहीणीने करुन घेतली भाषणाची तयारी
भाषण स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर एक भाषण कार्तिकला देण्यात आले. याच्या तयारीची जबाबदारी त्याच्या मोठ्या बहिणीवर लादण्यात आली. तीने भाषणाची तयारी करुन घेतली आहे.