केज तालुक्यातील महिलेचा बस मधून दीड लाखाचा गंठन लंपास; जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरीच्या घटना

केज : तालुक्यातील पिसेगाव येथील महिला कळंब-केज बस मध्ये प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने ३१ ग्राम सोन्याचे गंठन किंमत १ लाख ४८ हजार लंपास केल्याची घटना सोमवारी ( दि. २८ ) दुपारी ४ ते ४:३० दरम्यान घडली आहे. यासह जिल्ह्यातील नेकनूर, गेवराई, तलवडा, माजलगाव येथेही चोरीच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हरीदास शंकर नेहरकर ( वय ५८ वर्ष ) रा. कोंडुळवस्ती पिसेगाव ता. केज हे परिवारास कळंब येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये केजला येत होते. या दरम्यान अज्ञात व्यक्तीने हारीदास यांच्या सुनेचे ३१ ग्राम सोन्याचे गंठन ज्याची किंमत १ लाख ४८ हजार रुपये लंपास केले. केज येथे आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. यानंतर हरीदास नेहरकर यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गेवराई तालुक्यातील तलवडा येथेही हायवा भारतबेंज याचे पाच टायर डिक्स सह किंमत १ लाख २० हजार तसेच येथील मेडीकल मध्ये ही चोरट्यांनी हात मारत रोख ८०० रू. लंपास केले. यानंतर गेवराई पोलीस ठाणे हद्दीतील राजपिंप्री येथील शेतातील विहीरीवरील सोलार पंपसेट ज्यामध्ये वायर, सोलार प्लेट, ३ एच.पी.चा पंप आदी साहित्य एकूण किंमत २ लाख १५ हजार रू. अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. तसेच माजलगाव येथून स्प्लेंडर एम.एच. २३ के ६२३५ ही दुचाकी हॅन्डल लॉक तोडून चोरुन नेली. नेकनूर येथील आठवडी बाजारात पाळत ठेवून अज्ञात चोरट्याने हात चालाकीने पिशवीत ठेवलेलं १७ ग्रॅम सोन्याचे नेकलेस किंमत ७१ हजार ८२० चोरून नेला. या सर्व घटनांचे संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या वाढत्या घटना पहाता सामान्य माणसाच्या मनात चोरट्यांची दहशत निर्माण झाली परंतु पोलीसांची दहशत या चोरट्यांच्या मनात कधी निर्माण होईल असा प्रश्न विचारला जात आहे.