शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीक विमा जमा होतोय तुम्ही पासबुक तपासले का?
क्षेत्र एकच रक्कमेत तफावत असल्याने ताळमेळ लागेना

लोकगर्जनान्यूज
केज : अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याचे क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून तक्रार केली. पण पीक विमा मिळणार की, नाही? याबाबत अद्याप काहीच स्पष्ट नाही. परंतु तालुक्यातील आडस येथील दोन शेतकऱ्यांच्या खात्यावर बाजाज अलियान्झ कडून बँक खात्यावर रक्कम पडली आहे. त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचा क्लेम येत असल्याचे दिसून येत आहे. परंतु क्षेत्र एकच असताना रकमेत तफावत आहे. यामुळे ही रक्कम नेमकी कशाची याचा ताळमेळ लागेना. बजाज अलियान्झ कडून रक्कम येत असल्याने तुम्ही आपले बँक खाते तपासून पहा.
यावर्षी खरीप हंगामावर अनेक संकटं आली. प्रथम अतिवृष्टी, गोगलगाय यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर पीक मध्य अवस्थेत असताना पावसाने दडी मारली तब्बल २४ ते २५ दिवस पाण्याचा ताण पडल्यामुळे फुले व पापडी अवस्थेतील शेंग गळून पडली. हलक्या जमिनीवरील सोयाबीन पीक करपून गेलं. यावेळी पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना ॲग्रीम देण्यात यावे म्हणून जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढली परंतु विमा कंपनीने जिल्ह्यातील केवळ २८ महसूल मंडळांना ॲग्रीम दिला. गोगलगायने केलेल्या नुकसानीची फुटकी कवडीही शेतकऱ्यांना मिळाली नाही. यानंतर पीक काढणीस आलेले असताना परतीच्या पावसामुळे जागेवरच सोयाबीनची माती झाली तर कापसाच्या वाती झाल्या. या नुकसानीचे पीक विमा धारक शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून ऑनलाईन तक्रार केली. यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामे केले. पण विमा येणार की, नाही? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. याबाबत काही चित्र अद्याप स्पष्ट नाही. शेतकऱ्याचे नुकसान भरपाई व पीक विमा कंपनीच्या निर्णयाकडे शेतकरी डोळे लावून बसलेले आहेत. काल केज तालुक्यातील आडस येथून एक आनंदाची बातमी समोर आली. सोमवारी ( दि. ७ ) येथील शेतकरी सुषमा शिवरुद्र आकुसकर यांच्या बँक खात्यावर ३ हजार ६४५ रु. बजाज अलियान्झ कंपनीकडून जमा झाले तर, शिवम शिवशंकर आकुसकर यांच्या खात्यावर ४ हजार ५० रु. जमा झाले. त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे विमा क्लेम जमा होत असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही खातेदारांचे क्षेत्र ६१ आर आहे परंतु रक्कम कमी जास्त असल्यामुळे नेमकं ही रक्कम कोणत्या नियमानुसार येत आहे. काय निर्णय झाला. दोनच शेतकऱ्यांना रक्कम आली इतरांच्या बाबतीत आणखी काही चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना ताळमेळ लागत नाही. प्रशासन व विमा कंपनीकडून खुलासा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. सोमवारपासून बजाज अलियान्झ कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत असल्याने शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासून पाहावे.
* रक्कम अतिवृष्टीचीचं का?
पावसाने ताण दिल्याने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २८ महसूल मंडळांना २५% ॲग्रीम मंजूर झाले. त्याचे वाटप दिवाळी अगोदरच सुरू झाले होते.ॲग्रीम मधून होळ महसूल मंडळ वगळण्यात आलेले आहे. आडस होळ महसूल मंडळात येतो त्यामुळे आडस येथे शेतकऱ्यांच्या खात्यावर येत असलेली पीक विमा कंपनीची रक्कम अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे क्लेम असल्याचे दिसून येते तर, यापुर्वीही केज तालुक्यातील उंदरी येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याची चर्चा आहे. पण तेव्हाही कोणालाच ती रक्कम कशाची हे सांगता आले नाही. आताही तीच अवस्था आहे.