Panchnama Crop Loss – अवकाळी पाऊस अन् गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील अनेक गावांमध्ये दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी अडचणीत आले. या झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे ( Panchnama Crop Loss ) सुरू केले. आज रविवारी ( दि. १९ ) आडस ( ता. केज ) येथे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामे केले. परंतु पंचनामे फक्त फार्स ठरु नये शेतकऱ्यांना आधार मिळायला हवा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
सोमवार पासून बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. वेध शाळा व हवामान तज्ञ पंजाब डक यांच्या अंदाजानुसार शुक्रवार ( दि. १७ ) जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी सह आदि रब्बी पिके नष्ट झाली. फळबाग व भाजीपाल्याचे नुकसान झाले. आधीच खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असून, शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात नाही. त्यात पुन्हा हे अवकाळी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. दोन दिवस झालेल्या पाऊस व गारपीटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे ( Panchnama Crop Loss ) करुन शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत होते. याबाबत केज तालुक्यात पंचनामे सुरू झाले. आज रविवारी ( दि. १७ ) सकाळी वाघमारे, कृषी पर्यवेक्षक रविकांत ठोंबरे, साखरे, कसपटे आदि सह शेतकरी शिवरूद्र आकुसकर, सत्यप्रेम ढोले सह आदि शेतकरी उपस्थित होते.
पंचनामे फार्स ठरु नये!
परतीच्या पावसाने खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. तेव्हाही पंचनामे झाले, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची घोषणा झाली. प्रत्येक शेतकऱ्याकडून एक फॉर्म भरुन घेण्यात आला. परंतु अद्याप पदरात फुटकी कवडीही आली नाही. तोपर्यंत अवकाळी आला व पुन्हा होत्याचं नव्हतं झालं, पुन्हा पंचनामे सुरू झाले. हा केवळ फार्स ठरु नये. यावेळी तरी शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.