केज तालुक्यातील सरपंच पुत्राचा पराक्रम: चेक वर स्वाक्षरी साठी मागीतली लाच एसीबीची कारवाई

लोकगर्जनान्यूज
केज : सरपंच पुत्राने मनरेगा अंतर्गत मंजुर विहीरीच्या कुशल कामगारांचा रक्कम देण्यासाठी धनादेश ( चेक ) वर सही साठी वीस हजारांची लाच मागितली. याप्रकरणी एसीबीने बुधवारी ( दि. २८ ) आज सरपंच पुत्रावर कारवाई केली आहे.
केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीच्या श्रीमती आशाबाई नंदु उगलमुगले या सरपंच आहेत. तक्रारदार यांच्या मुलाच्या नावे मनरेगा योजनेतून जलसिंचन विहीर मंजुर आहे. या विहीरेचे कुशल कामगार निधीचा धनादेश ( चेक ) वर सरपंचाची सही देण्यासाठी तसेच ग्रामसेवकाला सहकार्यासाठी २० हजार लाचेची मागणी पंचासमक्ष केली. एसीबीच्या पडताळणी मध्ये लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्याने बीड एसीबीने लाच मागितल्या प्रकरणी सरपंच पुत्र सुधाकर नंदू उगलमुगले ( वय ३४ वर्ष ) याच्यावर कारवाई केली. या घटनेने केज तालुक्यात खळबळ माजली आहे.