msrtc bus- रा.प.महामंडळाकडून योजनांचा भडीमार अन् गाड्यांची मारामार
गाड्यांची संख्या कमी झाल्याने धारुर आगारातून 1 तास उशिरा धावतात बस

लोकगर्जनान्यूज
धारुर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ( msrtc bus ) अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे बसकडे प्रवाशांचा लोंढा वाढला आहे. परंतु प्रवाशांच्या तुलनेत बस उपलब्ध नाहीत. त्यामुळे धारुर आगाराच्या बस तब्बल एक तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना तासनतास प्रतिक्षा करुन उभे राहून प्रवास करावा लागत असल्याने योजनांचा भडीमार अन् गाड्यांची मारामार असे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येते असल्याने धारुर आगारला गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ( msrtc bus ) यापुर्वीच अपंगांसाठी,65 वर्षांच्या वर्षांसाठी टिकिट ( प्रवास भाडे सवलत ) तर 75 वर्षांच्या वर्द्धांसाठी मोफत प्रवास घोषित केले. या पाठोपाठ महिला सन्मान योजनेतून महिलांसाठी बस प्रवासात 50 टक्के भाडे सवलत सुरू केली. या योजनांमुळे प्रवाशांचा लोंढा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ( msrtc bus ) बसकडे वाढला आहे. परंतु धारुर आगाराच्या अनेक बसेस जुन्या झाल्याने त्या भंगारात ( scrap ) मध्ये काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाड्यांची संख्या घटली आहे. आहेत त्याचं गाड्यांवर नियोजन करताना यंत्रणेवर ताण येत आहे. तब्बल एक तासाने उशिरा गाड्या धावत आहेत. शनिवारी ( दि. 6 ) धारुर येथून आडस मार्गे अंबाजोगाई रस्त्यावर 1:30 वाजता सुटणारी गाडी 2:30 वाजता सोडण्यात आली. तब्बल एक तासाने गाडी लागल्याने बसला मोठी गर्दी झाली. अनेकांना अंबाजोगाई पर्यंत उभे राहुन प्रवास करावा लागला. बस मध्ये जागा नसल्याने अनेक प्रवाशांना बसस्थानकावर थांबावं लागलं. मध्ये असणारे आवरगाव, पांगरी, कोळपिंपरी, वाघोली, खोडस या थांब्यावरील प्रवासी घेता आले नाही. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. महामंडळ गाड्यांची व्यवस्था करु शकत नसेल तर मग या योजनेचा जनतेला उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित करत गाड्यांची संख्या कमी करुन योजना वाढवणं म्हणजे ‘प्रवाशांच्या कोपला गुळ’ असा प्रकार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. शासनाला व मी.रा.प.मं ( msrtc ) ला खरंच या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला घेता यावा असे वाटत असेल तर धारुर आगारला तात्काळ नवीन गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
गाड्याच नाहीत काय करणार?- नियंत्रक
धारुर येथून अंबाजोगाई कडे जाण्यासाठी गाड्या वेळेवर का धावत नाहीत? असे धारुर येथील बसस्थानक नियंत्रक विचारलं असता त्यांनी अनेक गाड्या भंगार ( scrap ) मध्ये निघाल्या आहेत. जोपर्यंत नवीन गाड्या उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत अशीच अवस्था रहाणार असून, यात भर उखडलेले रस्ते ही आहेत. अशी माहिती दिली.
खड्डेमय रस्त्यांनी केली गती कमी
धारुर येथून चिंचवण,वडवणी मार्गे बीड आणि आडस मार्गे अंबाजोगाई या दोन्ही मार्गांवरील रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांमुळे बसची गती कमी झाली आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या कमी त्यात रस्त्यांची दुरवस्था यामुळे बसचे वेळापत्रक कोलमडले असून, याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला सोसावं लागत आहे. यावर मात्र जिल्ह्यातील पुढाऱ्यांचे तोंड उघडत नसून, प्रशासनही झोपी गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.