महिला विश्व

MSRTC 50 टक्के सवलत पण यामुळे ‘भीक नको कुत्रा आवर’ म्हणण्याची महिला प्रवाशांवर वेळ

वडवणी ते धारुर ते अंबाजोगाई मार्गावर तास-तास प्रतीक्षा करावी लागतेय

लोकगर्जनान्यूज

बीड : MSRTC च्या बस ( Bus ) प्रवासात महिलांसाठी तिकीटात 50 टक्के सवलत राबविण्यात येत आहे. परंतु Bus वेळेवर येत नसल्याने रस्त्यावर उभे राहून महिला प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागतेय. यामुळे महिला प्रवाशांवर ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी वेळ आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. प्रतीक्षा करुनही नंतर खाजगी वाहनाने फूल तिकीट देऊन प्रवास करावा लागतो आहे. हे चित्र आहे वडवणी-चिंचवण ते धारुर आणि धारूर ते आडस-अंबाजोगाई या मार्गावरील. त्यामुळे मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या योजनेचा फायदा मिळावा म्हणून रा.प. महामंडळ या मार्गावर वेळेवर व फेऱ्या वाविण्याचे सौजन्य दाखविणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र शासनाने महिला सन्मान योजने अंतर्गत रा.प.महामंडळाच्या बसमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के भाडे सवलत जाहीर केली. या योजनेची ( दि. 17 ) पासून सर्व प्रकारच्या गाडीत अंमलबजावणी सुरू केली. परंतु चार दिवसांतच ही योजना धारुर आगाराच्या दळभद्री कारभारामुळे कोलमडली असल्याचे चित्र दिसून आले. धारुर ते चिंचवण-वडवणी मार्गे बीड अशा एसटी चालतात. परंतु फेऱ्या कमी असल्याने तसेच वेळेवर धावत नसल्याने महिला प्रवाशांना तासनतास बसची प्रतिक्षा करावी लागते. मंगळवारी ( दि. 21 ) सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वडवणी येथून धारुरला येण्यासाठी बस नव्हती. बसची तासभर प्रतीक्षा करुन अनेक महिला खाजगी वाहनाने गेल्या, 12 वाजता धारुर बस आली तिला फूल गर्दी असल्याने अनेक महिला व पुरुष प्रवाशांना धारुर पर्यंत उभे राहून प्रवास करावा लागला. यानंतर धारुर येथूनही 12: 30 पासून आडस, अंबाजोगाई साठी बस नव्हती. दीड वाजता अंबाजोगाई साठी बस लागली. तेही इतकी भरली की, आडस पर्यंत अनेक प्रवासी उभे होते. गर्दी खूप असल्याने कोळपिंपरी येथे दोन तासांपासून एसटीची वाट पाहत असलेल्या महिला प्रवाशांना घेता आले नाही. एकीकडे गाजावाजा करुन योजना जाहीर करायची अन् फेऱ्याही वाढवायच्या नाहीत असा दुटप्पीपणा का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तासनतास बसची प्रतिक्षा रस्त्यावर बसून करावी लागते. आडस येथे बसस्थानक नसल्याने महिलांना पान टपरी, हॉटेलचा आधार घेऊन बसची प्रतीक्षा करावी लागते. अर्धे तिकीट असल्याने एसटीने प्रवास करायची इच्छा आहे पण बस वेळेवर येत नाही. आली तर जाम गर्दी यामुळे बसमध्ये चढता ही येत नाही. चढले तर उभे राहून प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे महिला प्रवासी ‘भीक नको पण कुत्रा आवर ‘अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »