MPSC-धारूर तालुक्यातील दोघे बनले अधिकारी; डोंगर पट्ट्यातील तरुणांचा प्रेरणादायी प्रवास
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : तालुक्यातील पहाडी पारगाव आणि ढगेवाडी येथील सामान्य कुटुंबातील दोन तरुणांनी मेहनत व जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) परीक्षा सर करत श्रेणी एक चे अधिकारी बननण्याचे स्वप्न साकार केले. या तरुणांचे यश पहाता डोंगर पट्ट्यातील तरुणांसाठी प्रेरणास्थान निर्माण केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या यशाबद्दल बालासाहेब मुंडे व गोविंद गवळी या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पहाडी पारगाव अन् ढगेवाडी हे दोन गाव असले तरी ग्रामपंचायत एकच आहे. ग्रुप ग्रामपंचायत असल्याने या दोन्ही तरुणांना एकाच गावातील म्हणणं वावगं ठरणार नाही. या ऊसतोड मजुर व सामान्य शेतकरी असलेली आई अशा सामान्य कुटुंबातील व विशेष करुन डोंगर पट्ट्यातील एका लहान गावातील हे बालासाहेब मुंडे अन् गोविंद गवळी तरुण यांच्या गावासाठी आजही चांगला रस्ता नाही. तर इतर सुविधांचा विचारही न केलेला बरा. परंतु घरातील गरीबीची जाण असल्याने आयुष्यात आपण काहीतरी करुन आपल्यासाठी हाडांची कांड करणाऱ्या मायबापाला आधार देण्याचे वचन आपल्याच मनाला देऊन जिद्द अन् चिकाटीने अभ्यासाला लागले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. एकाच्या डोक्यावरील वडीलांचे छत्र हरवलेलं आहे त्या शेतीत राबून आईने लहानचा मोठं केलं. जमेल तसे पैसे खर्चून शिकवलं आईच्या या मेहनतीला बघून बालासाहेब मुंडे यांना अभ्यासाचा कंटाळाच आला नाही. गोविंद गवळी यांचे आई-वडील ऊसतोड मजुर या मजुरांना काय श्रम करावे लागते हे त्यांनाच माहीत. या सर्वसामान्य कुटुंबातील डोंगर पट्ट्यातील दगड मातीत वाढलेली बालासाहेब अन् गोविंद हे हिरे ठरले. कोणत्याही सुविधा नसताना मेहनत करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) ची परीक्षा दिली. याचा नुकताच गुरुवारी ( दि. १८ ) निकाल लागला. यामध्ये या दोघांनी यश संपादन करुन श्रेणी १ चे अधिकारी होण्याचा मान कमावला. आपल्यासाठी हाडांची कांड करणाऱ्या मायबापाची मान उंचावून आपल्या गावची मातीची मान उंचावली आहे. धारुर तालुका म्हणजे डोंगरी भागाचा तालुका समजला जातो. शेती अन् ऊस तोडणी हे दोनच काम या तालुक्यातील जनतेची पोट भरण्याची साधने, अशा स्टोन बेल्ट भागातील एकाच गावातील बालासाहेब मुंडे अन् गोविंद गवळी यांनी ( MPSC ) सर करुन तरुणांसाठी आदर्श निर्माण केला. नक्कीच यांच्याकडून प्रेरणा घेऊन या भागातील तरुण, विद्यार्थी वाटेने प्रवास करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गोविंद गवळी पाचवेळा पाच वेळा ( MPSC ) पास
गोविंद गवळी ढगेवाडी ता. धारुर हे या अगोदर सहाय्यक कक्ष अधिकारी दोन वेळेस उत्तीर्ण, सेल टॅक्स अधिकारी उत्तीर्ण , सध्या कौशल्य विकास अधिकारी नागपूर येथे ट्रेनिंग घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन १८३० पैकी ५० रँक घेऊन पोलीस उपाधीक्षक म्हणून सेवा बजावणार आहेत. पाच वेळा ( MPSC ) सर करणे ही खरंच साधी सोपी गोष्ट नाही. हा प्रवास धारुर तालुक्यातील विद्यार्थी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.