mobile blast- लेकरांना मोबाईल पासून दूर ठेवा बीड जिल्ह्यातील ‘या’ शहरात धक्कादायक घटना
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : एक 7 वर्षांचा मुलगा घरातच जुना बंद पडलेला मोबाईल घेऊन खेळत होता. त्या मोबाईलचा अचानक स्फोट ( mobile blast ) झाल्याने मुलाचा चेहरा भाजला व इतर कपड्यांना आग लागली. परंतु आवाज ऐकून आई धावत येऊन मुलाला बाजुला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. ही धक्कादायक घटना धारुर ( जि. बीड ) येथे रविवारी घडली आहे. यामुळे मुलांना मोबाईल पासून दूर ठेवने आवश्यक असल्याचे मत जागरुक नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, बाळासाहेब सोळंके रा. आमला ( ता. धारुर ) हे मुलांच्या शिक्षणासाठी धारुर शहरातील कसबा भागात रहातात. ते स्वतः राज्य परिवहन महामंडळ मध्ये पनवेल आगारात सेवेमध्ये आहेत. रविवारी ( दि. ३० जुलै ) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अनिकेत ( वय 7 वर्ष ) हा मुलगा जुना बंद पडलेला मोबाईल घेऊन घरातील पलंगावर खेळत होता. यावेळी सदरील मोबाईलचा स्फोट ( mobile blast ) झाला. यामुळे मुलाचा चेहरा भाजला तर पलंगावरील कपडे व गादीने पेट घेतला. हा आवाज व मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून आई धावत आली असता आतील चित्र पाहून हादरून गेली. परंतु स्वतःला सावरत त्यांनी मुलगा अनिकेला बाजुला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. तातडीने मुलाला शहरातील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथे उपचार करण्यात आले. मुलाची प्रकृती ठिक आहे. मोबाईलचा स्फोट ( mobile blast ) झाल्याची बातमी कळताच शहरात खळबळ उडाली आहे.
लेकरं रडु लागली की, मोबाईल देणाऱ्यांनो लक्ष द्या
आजकाल लहान मुले रडु लागली अथवा शांत बसत नसल्याने अनेक पालक,माता लेकरांना मोबाईल देऊन त्यात गुंतवून ठेवतात. आपल्या कामामध्ये लागतात. परंतु ही कृती आपल्या बाळाच्या जीवावर बेतू शकते असे धारुर येथील घटनेवरून दिसून येत आहे. त्यामुळे इतर काही उपाययोजना करावी परंतु लेकरांना मोबाईल पासून दूर ठेवने आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.