Kaij-केज दुचाकीच्या डिग्गीतून ३ लाख लंपास;अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
केज : मेडीकल मधून औषध घेईपर्यंत दुर्लक्ष झाल्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डिग्गीतील ३ लाख रुपये लंपास केल्याची घटना आज सकाळी ११:३० च्या सुमारास शहरातील वर्दळीच्या ठिकाणी घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी वाढत्या चोरीच्या घटनानी शहरातील नागरिकांना मध्ये चोरट्यांची भीती पसरली आहे.
सर्जेराव केदार रा. एकुरका ( ता. केज ) हे आज बुधवारी ( दि. १७ ) सकाळी मुलासह केज येथे आले. कळंब रस्त्यावरील एसबीआय बँकेतून ३ लाख रुपये काढले अन् ती रक्कम दुचाकीच्या डिग्गीत ठेवली. दुचाकीवरून कानडी रोड चौकातील एका मेडिकलवर औषध घेण्यासाठी गेले. या वेळेत दुचाकीकडे दुर्लक्ष झाल्याने अज्ञात चोरट्याने फायदा घेऊन डिग्गीतील ३ लाख रू. रोकड घेऊन पसार झाला. औषध घेऊन दुचाकीकडे आले असता डिग्गी उघडी दिसल्याने आत पाहिले असता रक्कम गायब होती. याप्रकरणी सर्जेराव केदार यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील करत आहेत. केज येथील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे येथे कायद्याचे नव्हे तर चोरट्यांचे राज्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या घटनेत चोरट्यांनी बँकेपासून यांच्यावर पाळत ठेवून हा प्रकार केल्याचे दिसून येत असून पोलीसांनी ठरविले तर चोरटे मिळू शकतात अशी चर्चा नागरिक करत आहेत.