iPS मीना यांची धडाकेबाज कारवाई; केज येथे पिस्तूल, काडतूस सह दरोड्याच्या तयारीतील सातजण जेरबंद
लोकगर्जनान्यूज
केज : अंबाजोगाई येथून नेकनूरच्या दिशेने चाललेल्या चारचाकी वाहनाला पकडून झडती घेतली असता वाहनातील एका जवळ गावठी कट्टा ( पिस्तूल ) जिवंत काडतूस व वाहनात लोखंडी रॉड,लाकडी दांडा आदी साहित्य मिळून आले. ही टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत होती असा संशय असून सात जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई आयपीएस कमलेश मीना यांचे पथक व केज पोलीसांनी केली.
सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस IPS कमलेश मीना यांना अंबाजोगाई येथून इर्टिगा गाडीत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने टोळी अंबाजोगाई येथून केजच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच मीना यांनी त्यांच्या पथक व पोलीसांना सूचना देऊन सापळा लावण्यास सांगितले. सदरील संशयित गाडी केज येथे येताच पोलीसांनी थांबवून पोलीस ठाण्यात नेऊन झडती घेतली असता यावेळी एका जवळ गावठी कट्टा, जिवंत काडतूस तसेच वाहनाची झडती घेतली असता आतमध्ये लोखंडी रॉड, लाकडी दांडा, रिकामे मॅक्झीन, स्क्रु ड्रायव्हर असे साहित्य मिळून आले. याप्रकरणी संशयित आरोपी गणेश पांडुरंग भोसले रा. यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई, हारीष तोमर कर्नाटक ह.मु. डोंबिवली, मुंबई, नारायण मंगळा ओडीसा हे.मु. सायन मुंबई, श्रीनिवास आशाअली बारगम रा. बांद्रा पुर्व मुंबई, श्रावण शिवाजी गायकवाड रा. बोरीवली मुंबई, दिपक दशरथ चाटे उर्फ ताठे रा. धर्मेनाका कामगार नगर – 2 मुंबई, नामदेव परसु पोवार रा.कामोठा नवी मुंबई या सात आरोपींना ताब्यात घेऊन पोना विकास चोपणे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीवर यापुर्वीचे जबरी चोरी, दरोडा, खूनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.