HSC BOARD EXAM- बीड जिल्ह्यात खळबळ; अंबाजोगाईच्या शेकडो विद्यार्थ्यांची बोर्डाकडून चौकशी सुरू
या विद्यार्थ्यांचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता!
लोकगर्जनान्यूज
बीड : बारावी बोर्ड परीक्षा ( HSC BOARD EXAM ) मध्ये बीड जिल्ह्यातील गंभीर प्रकार बोर्डाच्या लक्षात आला असल्याने 300 पेक्षाही जास्त बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची बोर्डाने चौकशी सुरू केली. हे बहुतांश विद्यार्थी अंबाजोगाई येथील असल्याचे वृत्त आहे. यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ माजली असून या विद्यार्थ्यांच्या निकालाला उशीर लागणार का? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
इयत्ता 10,12 बोर्ड परीक्षा HSC, SSC BOARD EXAM काळात अनेक गैरप्रकार समोर आले. आता या दोन्ही बोर्ड परीक्षांचे निकाल जवळ आले आहे. परंतु याचा घोळ काही मिटत नसून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एक गंभीर प्रकार समोर आला. भौतिकशास्त्र ( physics ) पेपर मध्ये अक्षर बदल आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच पेपर तपासणी करणाऱ्यांनी याची माहिती बोर्डाला दिली. बोर्डाने गंभीर दखल घेऊन या सर्व 300 पेक्षा जास्त 12 च्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद ( छ.संभाजीनगर ) विभागीय कार्यालयाने सुनावणीसाठी बोलावलं आहे. याची चौकशी सुरू झाली असून पहिल्या दिवशी एकूण ८७ विद्यार्थी सुनावणीसाठी हजर झाले. हे सर्व विद्यार्थी अंबाजोगाई येथील असून इतर मागे राहिलेले विद्यार्थी बहुतांश अंबाजोगाईचेच असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या विद्यार्थ्यांच्या निकालाला उशीर लागणार असे चिन्ह दिसून येत आहे.
काय आहे प्रकार?
बारावीच्या भौतिकशास्त्र ( physics ) पेपरचे काही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु यामध्ये अक्षर व शाई बदल आढळून आला. तसेच उत्तराच्या व्यतिरिक्त ही काही मजकूर लिहिला आहे. हा प्रकार पेपर तपासणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी बोर्डाला याची कल्पना दिली. याची दखल घेऊन बोर्डाने या सर्व 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली. यासाठी सर्वांना बोर्डात सुनावणीसाठी हजर राहण्याचे सांगितले असून, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू झाली आहे.
चार दिवस चालणार सुनावणी
सुनावणी सुरू असलेले एकूण 320 विद्यार्थी असून, दररोज 80 विद्यार्थ्यांना सुनावणीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे ही सुनावणी एकूण चार दिवस चालणार असे चिन्ह आहेत. पहिल्या दिवशी सुनावणीसाठी 87 विद्यार्थी पालकांसह दाखल झाले होते.
विद्यार्थी म्हणतात आमच अक्षरचं नाही
सुनावणीसाठी हजर असलेल्या विद्यार्थी व पालकांशी स्थानिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता विद्यार्थ्यांनी आम्ही परीक्षा काळात काहीच चुकीचे काम केले नाही. पेपर वर जो अक्षर आहे तो आमचा नाही असे स्पष्ट सांगितले आहे. या प्रकाराबद्दल विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला.
बोर्डाने विद्यार्थ्यांचे लेखी म्हणणे घेतलं
सुनावणीसाठी हजर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे म्हणणे बोर्ड अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात घेतलं आहे.
सखोल चौकशी होणार
विद्यार्थी म्हणतात आमचं अक्षरचं नाही. मग हे लिहिले कोणी? या मागचा उद्देश काय? या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे वृत आहे.