crop insurance- बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
19 मंडळातील शेतकऱ्यांना 13 कोटी 53 लाख रुपये मिळणार

लोकगर्जनान्यूज
बीड : सप्टेंबर महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी 47 महसूल मंडळांसाठी 25% पीक विमा ( crop insurance ) अग्रीम साठी अधिसूचना काढली होती. परंतु विमा कंपनीने यास विरोध करत 28 महसूल मंडळांना अग्रिम दिला. परंतु जिल्ह्याचे कृषी अधिक्षक यांनी वारंवार विमा कंपनी बजाज आलायन्झ कडे पाठपुरावा केला. यास यश आले असून त्या राहिलेल्या 19 महसूल मंडळांना अग्रीम देण्यास विमा कंपनी तयार झाली. यामुळे जिल्ह्यातील 90 हजार 139 शेतकऱ्यांना 13 कोटी 53 लाख 75 हजार 43 रु. मिळणार आहे. ही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून , पावसाची दडी, अतिवृष्टी, गारपीटीने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पेरणी होऊन पिके बहरुन येताच बीड जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दडी मारली होती. यामुळे फुल व पापडी शेंग अवस्थेत असलेल्या सोयाबीन, पाते लागण्यावेळी कापसाला ताण येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे प्रशासनाने सर्वे करुन तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी 14 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील एकूण 47 महसूल मंडळांसाठी 25 टक्के अग्रीम देण्याची अधिसूचना काढली. परंतु विमा कंपनीने यास नकार देत 28 महसूल मंडळांना अग्रीम देण्याचे प्रशासनाला कळवून या निर्णयावर ठाम राहून 47 पैकी 28 महसूल मंडळांना अग्रीम वाटप केला. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. परंतु याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बीड बाबासाहेब जेजुरकर यांनी विमा कंपनीकडे सतत पाठपुरावा केला. यासंबंधी कंपनीच्या प्रतिनिधींशी बैठका व पत्रव्यवहार सुरू ठेवून या उर्वरित 19 महसूल मंडळांना अग्रीम मिळावा यासाठी प्रयत्न सुरू ठेवले या प्रयत्नांना यश आले. बजाज आलायन्झ विमा कंपनीने त्या उर्वरित 19 महसूल मंडळांना पीक विमा ( crop insurance ) अग्रीम देण्याचा निर्णय घेतला आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याबाबत आज लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
90 हजार शेतकऱ्यांना दिलासा
विमा कंपनीने त्या उर्वरित 19 महसूल मंडळांना अग्रीम देण्याचा निर्णय घेतल्या जिल्ह्यातील एकूण 90 हजार 139 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, हा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे.
इतकी रक्कम येणार?
जिल्ह्यातील 19 महसूल मंडळातील 90 हजार 139 शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 कोटी 53 लाख 75 हजार 43 रु. येणार आहेत. अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे आधार मिळेल.
‘या’ महसूल मंडळांचा समावेश
बीड, ब्रह्मनाथ येळंब, धोंडराई, दिंद्रुड, गोमळवाडा, होळ, कवडगाव बु, कुर्ला, नाळवंडी, पाचेगाव, पाडळसिंगी, पारगाव शिरस,पेंडगाव, नवगण राजुरी, रेवकी, शिरुर, तलवडा, तिंतरवणी, दपलवडगाव