‘त्या’१०० टक्के अनुदानित उर्दू शाळा मान्यता रद्द निर्णयाला स्थगिती

लोकगर्जनान्यूज
धारुर : तालुक्यातील १०० टक्के अनुदानित एकमेव उर्दू शाळेची मान्यता नुकतीच रद्द केल्याचा निर्णय देण्यात आला होता. या निर्णयाने बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. परंतु या निर्णयाला पुन्हा कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी स्थगिती दिली. तसे पत्र ( दि. २३ ) देण्यात आले.
अंजुमन इशात-ए-तालीम, बीड संचलित मिलिया उर्दू प्राथमिक शाळा, धारुर ही तालुक्यातील उर्दू शिक्षण देणारी एकमेव प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या असुविधे बाबतीत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पाहाणी करुन येथे शिक्षण हक्क कायद्यानुसार सुविधांचा अभाव दिसून आले. त्यानुसार शाळेची मान्यता रद्द करण्यात आली. १०० टक्के अनुदानित शाळा रद्द करुन तसे येथील विद्यार्थ्यांचे फातेमा उर्दू शाळेत समायोजन करण्याचे आदेश दिले. शाळेची मान्यता रद्द होण्याची प्रथमच घटना घडली असल्याने बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. परंतु यानंतर पालकांमधून या निर्णयामुळे रोष निर्माण झाला. मुलांच्या शिक्षणाची चिंता व्यक्त करत या निर्णया विरुद्ध शासनाकडे पालकांनी तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेऊन व मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून कक्ष अधिकारी महाराष्ट्र राज्य प्रदिप पडोळे यांनी मान्यता रद्द निर्णयाला स्थगिती देण्यात येत असल्याचे पत्र ( आदेश ) बुधवारी ( दि. २३ ) काढले आहे. ते पत्र संबंधित विभागाला व संस्थेच्या सचिव व अध्यक्षांना पाठविण्यात आले आहे. यामुळे आहे त्याच शाळेत चिमुकल्यांना शिक्षण मिळणार असल्याने पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
* सुविधांचं काय?
ज्या कारणावरून व प्रत्यक्ष पाहाणी केली तेंव्हा आढळून आलेल्या असुविधांमुळे शाळेची मान्यता रद्द केली होती. आता त्याला स्थगिती दिली. पण त्या असुविधा दूर होतील का? विद्यार्थ्यांना अधिनियम २००९ नुसार सुविधा मिळणार का? असा ही सवाल उपस्थित केला जात आहे.