Beed rain update- पहिल्याच पावसात ‘या’भागात पाणीच पाणी; गाय दगावली तर म्हैस वाहून गेली
जिल्हाभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

लोकगर्जनान्यूज
बीड : सर्वांचेच अंदाज फोल ठरले, जून महिना संपत आला तरी पाऊस न आल्याने शेतकरी चिंतेत होते. शनिवारी ( दि. २४ ) सायंकाळच्या सुमारास केज तालुक्यातील माळेगाव, सुर्डी, सोनेसांगवी, मांगवडगाव,सुकळी, गोटेगाव परिसरात दोन तास मुसळधार पाऊस झाला. पहिल्याच पावसात या भागातील नदीनाले वाहू लागले आहेत. तसेच वीज कोसळून एक गाय तर नदीच्या पुरात म्हैस वाहून गेली आहे. आडस येथेही शुक्रवारी व शनिवारी दोन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. शनिवारी सायंकाळी बीड जिल्ह्यातील अनेक गावांत रिमझिम, मध्यम व दमदार स्वरुपाचा पाऊस झाला. पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी आनंदी दिसत आहे.
पाऊस लवकरच सुरू होणार, मान्सून ( monsoon ) लवकर येणार, पेरण्याही २० जूनच्या आत होतील? असे एकना अनेक अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे शेतकरी बी-बियाणे खरेदी करून पावसाची प्रतीक्षा करत होता. परंतु पाऊस येत नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या आणि जास्त दिवस पावसाने जर आखडले तर पेरण्यावर काही विपरीत परिणाम होतो की, काय? अशी भीती निर्माण होऊ लागलेली होती. हवामानाचे अंदाज जरी काही ठिकाणी खरे होत होते तरी अनेकवेळा पावसाचे अंदाज हे खोटे ठरत असल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झालेली होती. पण शनिवार ( दि. २४ ) बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे जोरदार आगमन झाले. अक्षरशः या पहिल्याच पावसाने केज तालुक्यातील माळेगाव, माळेगाव, मांगवडगाव, सुर्डी,सोनेसांगवी आदी गावांना झोडपून काढले. सलग दोन तास पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदीनाले वाहू लागले असून अनेक विहिरी पाण्याने भरुन गेल्या आहेत. एकदाची पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून लवकर पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच शनिवारी सायंकाळी बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रिमझिम,मध्यम व जोरदार पाऊस झाला. दिवसभर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण व शुक्रवारी रात्री पाऊस झालेला असल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने मागील काही दिवसांपासून उष्णतेचा सामना करत असलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे.
वीज पडून गाय ठार पाण्यात वाहून गेल्याने म्हैस बेपत्ता
माळेगाव ( ता. केज ) येथील अरुण चंद्रसेन गव्हाणे यांची घराजवळ चिंचाच्या झाडाखाली बांधलेली गाय वीज पडून दगावली .गाभण असलेली गाय दगावल्याने शेतकऱ्याचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. मांगवडगाव ( ता. केज ) येथील कल्याण गायके हे बैलगाडीतून कुटूंबीयासह घरीं परतत होते. बैलगाडीच्या मागे म्हैस होती. ती ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात म्हैस वाहून गेली. शोधूनही सापडली नाही. बैलगाडीतील इतर व्यक्ती इकमेकांच्या साह्याने सुखरूप बाहेर आले,बैलांना ओढून बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.