Beed Rain update – बीड जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा
विजांचा कहर जनावरे दगावली तर गारपीटीने बर्फाचा थर

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्याला शनिवारी ( दि. ८ ) पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले असून, या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका केज व बीड तालुक्यांना बसला आहे. मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे तसेच फळबाग आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले. वीजा कोसळून केज तालुक्यातील सहा तर बीड तालुक्यात दोन जनावरे दगावली आहेत. मार्च मध्येच गारपीटीने व अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. पुन्हा तोच फटका शेतकरी कसा जगेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शनिवारी ( दि. ८ ) दुपारी बीड जिल्ह्यातील बीड, केज, गेवराई, वडवणी, धारुर येथे अवकाळी पाऊस झाला. केज तालुक्यातील नांदूरघाट, उत्तरेश्वर पिंप्री, शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, हादगाव डोका, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव, युसुफवडगाव, धनेगाव, कोरेगाव, कोठी, मस्साजोग, चिंचोली माळी, सुर्डी (सोनेसंगवी), लाखा, सोनेसांगवी, विडा या ठिकाणी वादळीवारा व वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसासोबत गारपीट मोठ्या प्रमाणात झाली. गारपिटीने फळबाग, भाजीपाला, रब्बी पिके, फुल शेती पुर्णपणे उध्वस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मार्च महिन्यातच गारपीटीने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातून तो बाहेर निघाला नाही तोच हा आघात झाला. यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. तेंव्हा नुकसानीचे पंचनामे झाले आहेत पण अद्याप त्यावर काहीच निर्णय नाही. आताही पंचनामे करण्याची मागणी होत असून, शासन काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
केज तालुक्यात चार ठिकाणी वीज पडून सहा जनावरे दगावली
या अवकाळी पावसात विजांचाही कहर पहाण्यात आला. केज तालुक्यातील हंगेवाडी येथे वीज पडून शशिकांत संपत हांगे यांचा बैल, जयराम तुकाराम हांगे यांचा बैल एक गाय, देवगाव येथे नारायण मुंडे यांचा बैल, मांगवडगाव येथे दत्तू मुळूक यांची गाय तसेच रामेश्वर वाडी येथील शेतकरी लक्ष्मण आबासाहेब आंधळे यांची शेळी असे एकूण सहा जनावरे दगावली आहेत.
बीड तालुका
तिप्पट वाडी ( ता. बीड ) येथेही वीज कोसळून शेतकरी आनंत नामदेव शेंडगे यांची खिलार बैलजोडी दगावली आहे. तसेच काही भागात आज इतका जोरदार पाऊस झाला की, बिंदुसरा नदीला पूर आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील बेलखंडी ( पा. ) या.बीड येथील बिंदुसरा नदीला पाणी वाहतानाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.