Beed News-वाजंत्री, स्वयंपाकी अन् नवरदेवाची वरात पोलीस ठाण्यात;काय आहे प्रकरण?
लोकगर्जनान्यूज
वडवणी : तालुक्यातील देवळा ( बु ) येथे रविवारी ( दि. 23 ) बालविवाह पार पडला. याची माहिती चाईल्ड लाईनला मिळताच सर्व यंत्रणा अलर्ट झाली, लग्न सोहळ्याच्या ठिकाणी तहसीलदार, वडवणी पोलीसांनी धाव घेतली. प्रशासकीय वाहने पहाताच वऱ्हाडी मंडळींनी धूम ठोकली. याप्रकरणी ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून नवरदेव, वाजंत्री,स्वयंपाकी सह 18 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने नवरदेवाची वरात पोलीस ठाण्यात पोचली आहे.
बीड जिल्ह्यातील वाढते बालविवाह प्रकरणी, हे विवाह अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर होतात असे अनुभव असल्याने बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी यापुर्वीच बैठक घेऊन बालविवाह रोखण्यासाठी व जनजागृती करुन पालकांना मुला-मुलिंचे बालविवाह करण्यापासून रोखण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत. बालविवाहस उपस्थित रहाणाऱ्या वऱ्हाडी, वाजंत्री, विवाह लावणारा भटजी, वाजंत्री, नवरदेव, पालकांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत. तरीही बालविवाह होत असून रविवारी ( दि. 23 ) देवळा ( बु ) ( ता. वडवणी ) येथे पार पडला. या बालविवाहची माहिती बीडच्या चाईल्ड लाईनला मिळाली. त्यांनी ही माहिती वडवणी तालुका प्रशासनाला दिली. माहिती मिळताच वडवणीचे तहसीलदार प्रकाश सिरसेवाड, सपोनि ( API ) आनंद कांगुणे यांनी कर्मचाऱ्यांसह विवाह स्थळी धाव घेतली. तहसीलदार,पोलिसांची वाहने येत असल्याची पाहून वऱ्हाडी मंडळींनी धूम ठोकली. या बालविवाह प्रकरणी ग्रामसेवक वसंत भगवान पवार यांच्या तक्रारीवरून वधू – वराचे पालक, स्वयंपाकी, वाजंत्री, नवरदेव सह आदी 18 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.