Beed News – खळबळजनक! शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकाला जाळण्याचा प्रयत्न
लोकगर्जनान्यूज
बीड : येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दोन दिवसांपासून न्यायासाठी एकजण आंदोलन करत आहे. रात्री या आंदोलकाला अज्ञातांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलकाने वेळीच सावधगिरी बाळगल्याने काही इजा झाली नाही. आज सकाळी ही वार्ता समजताच जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कन्या शाळेत सध्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे कार्यालय आहे. हा परिसर म्हणजे चोवीस तास रहदारीचा असून, याच रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, तहसील सह आदि म्हत्वाची कार्यालय आहेत. या ठिकाणी चरणदास वाघमारे कालपासून आंदोलन करत आहेत. काल दिवसभर त्यांच्याकडे कोणीही न फिरकल्याने रात्री ते आंदोलन स्थळीच मुक्कामी होते. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या डोक्याखाली असलेल्या उशीला कोणीतरी आग लावली. डोक्याला गरम लागताच ते जागे झाले. त्यामुळे जीव वाचला आहे.
आंदोलनाची मागणी काय?
चरणदास वाघमारे असे आंदोलनकर्त्याचे नाव असून ते शिरुर कासार तालुक्यातील तागडगाव येथील कै. सुभद्राबाई माध्यमिक विद्यालयात सह शिक्षक आहेत. परंतु त्यांचा पगार होत नसल्याने पगार द्यावा म्हणून सोमवार पासून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. यावेळी ही घटना घडली. जाणीवपूर्वक मला जाळण्याचा हा प्रयत्न केला गेला असा आरोप वाघमारे यांनी केला.