Beed News-केज तालुक्यात सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ चढले पाण्याच्या टाकीवर
शोले स्टाईल आंदोलन पोलीस, महावितरण विभागाची धावपळ

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील सोनेसांगवी येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून वीजपुरवठा प्रश्ननी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस व महावितरणच्या अभियंता यांनी आंदोलन स्थळी धाव घेतली आहे.
सोनेसांगवी ( ता. केज ) येथील मागील पंधरा दिवसांपूर्वी येथील सिंगल फेजचे रोहित्र जळाले आहे. पंधरा दिवस उलटून गेले तरी ते न मिळाल्याने गाव अंधारात चाचपडत असून, तब्बल पंधरा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने, पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागतं आहे तर दळणासाठी केज अथवा इतरत्र जावं लागतं आहे. यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना संपर्क करुन रोहित्र देण्याची मागणी केली पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. यामुळे महावितरण कंपनीच्या दळभद्री कारभाराला वैतागून सरपंच मुकुंद कणसे, उपसरपंच राहुल डिकले, ग्रामस्थ गिराम वाघमारे, शेख एजाज, सुरेश गालफाडे यांनी वीजपुरवठा सुरळीत करा म्हणून सकाळीच गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी विजेसाठी शोले स्टाईल आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस, महावितरणचे अभियंता जाधव हे दुपारी १ वाजता हजर झाले. सध्या त्यांची बोलणी सुरू असून आंदोलन कर्ते वीजपुरवठा सुरू झाल्या शिवाय खाली उतरणार नाही यावर ठाम आहेत.या आंदोलनाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.