Beed News – कानफटाला बंदुक लाऊन २० लाख खंडणीची मागणी; आरोपी चार तासात जेरबंद
लोकगर्जनान्यूज
बीड : एका विद्यार्थ्याला दुचाकीवर घेऊन जाऊन मारहाण करत कानफटाला बंदुक ( पिस्टल ) लाऊन २० लाख रुपये खंडणीची मागणी केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीसांनी अवघ्या चार तासात संशयित आरोपींना जेरबंद केले. या घटनेने मात्र बीड शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, जय विशाल हजारी ( वय १९ वर्ष ) रा. पोलीस अधीक्षक कार्यालय समोर, बीड या विद्यार्थ्याला पैसे देण्याचा बहाना करून एकाने दुचाकीवर बसवून नेले. एका अनोळखी तरुणाजवळ दुचाकी थांबवली, यानंतर दोघांनी जय हजारी याच्या कानफटावर पिस्टल लाऊन २० लाखांची खंडणी मागितली. तसेच पैसे नाही दिले तर जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. या प्रकरणी घाबरलेल्या तरुणाने सरळ पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यावरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य पाहून स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजी नगर पोलीस ठाणे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तातडी तपासाची चक्रे फिरवली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना गुप्त खबऱ्या कडून या गुन्ह्यातील संशयित आरोपींच्या ठिकाणाची माहिती मिळाली. माहिती मिळताच पळून जाण्याच्या तयारीत असलेले आरोपी मनीष प्रकाश क्षीरसागर ( वय २३ वर्ष ) रा. स्वराज्य नगर,बीड आणि शैलेश संतोष गिरी ( वय २३ वर्ष ) रा. कागदी वेस,बीड या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून गावठी पिस्टल, सुरा,कुकरी व दोन चाकु असे घातक शस्त्र जप्त केली. पुढील तपासासाठी सदरील आरोपींना शिवाजीराव नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. अवघ्या चार तासात खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावून संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्याने बीड पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.