Beed News – अवकाळी पावसामुळे ज्वारीचे नुकसान; पीकविमा भरला असेल तर हे काम करा
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्हाभरात रविवारी रात्री अवकाळी पावसाने झोडपून काढले असून हा पाऊस हरभरा,गहू साठी फायद्याचा असलातरी ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. सकाळी काही भागात मोठ्या प्रमाणात धुके आल्याने याचाही फटका हरभरा या पिकाला बसेल अशी शेतकऱ्यांची चर्चा आहे.
बीड जिल्ह्यात पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांची निराशाच झाली. पाण्याअभावी यब्बी हंगामही असातसाच असून ज्वारी पीक पदरात पडेल म्हणून सोयाबीन काढताच काही शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली. आहे त्या पाण्यावर सांभाळ केला. सुरवातीला पेरणी केलेलं ज्वारी पीक सध्या डोक्यापर्यंत वाढलेलं आहे. परंतु रविवारी रात्री जिल्ह्यामध्ये अनेक भागात सुसाट वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वारा व पावसामुळे ज्वारी पुर्णपणे पडली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ज्वारीचे नुकसान झाले असले तरी हा पाऊस हरभरा व गव्हासाठी फायद्याचा ठरणार असल्याचे समाधान आहे. रात्री जोरदार पाऊस झाल्याने रविवारी सकाळी काही भागात मोठ्या प्रमाणात धुके पडले होते. या धुक्यामुळे हरभरा, गहू व भाजीपाल्यावर बुरशीजन्य रोग पडण्याची शक्यता असल्याने या पिकांना वाचविण्यासाठी फवारणीचा खर्च वाढणार आहे.
पीक विमा भरला असेल तर तक्रार करा
ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस, तूरीचा पीकविमा भरला असेल तसेच रब्बी हंगामातही पिकांचा विमा भरला असेल या शेतकऱ्यांनी रात्रीच्या पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करुन पीकविमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार करावी.