Beed-हृदयद्रावक घटना! केज शहरात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू
बहीण-भावास वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही मृत्यू
लोकगर्जनान्यूज
केज : आई सोबत धुणे धुण्यासाठी गेलेले बहीण व भाऊ अचानक पाण्यात बुडू लागले. आईने आरडाओरडा केली. हा आवाज ऐकून तरुण धावत आला व पाण्यात उतरला पण तिघेही पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना केज शहरात आज शनिवारी ( दि. १४ ) सायंकाळी उघडकीला आली. या घटनेने केज तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दसरा येत्या २४ तारखेला असून, घटस्थापना होणार आहे. या आगोदर घराची साफसफाई करुन सर्व कपडे धुण्यात येतात. यामुळे तलाव, नदी, पाणी उपलब्ध आहे अशा प्रत्येक ठिकाणी धुणे धुण्याची लगबग दिसून येते. हा परिसर रंगीबेरंगी होऊन जातो. केज शहरातील गणेश नगर भागातील दोन महिला धुणे धुण्यासाठी बीड रस्त्यावर असलेल्या खदानीवर गेले होते. यावेळी आई सोबत मुलंही आलेली होती. धुणे धुताना अचानक सख्खे बहीण व भाऊ पाण्यात बुडू लागले. लेकरं बुडत असल्याने आईने आरडाओरडा करत त्यांना वाचवण्यासाठी धाव घेऊन पाण्यात उतरली, ही आरडाओरडा ऐकून बाजुलाच असलेल्या तरुणाने धाव घेत चिमुकल्यांना वाचवण्यासाठी पाण्यात झेप घेतली. परंतु नियतीला वेगळेच मान्य होते. सोमेश्वर गजानन वाघमारे ( वय १५ वर्ष ), वैष्णवी गजानन वाघमारे ( वय १२ वर्ष ) यांच्यासह वाचवण्यासाठी पाण्यात झेप घेतलेला अविनाश संतोष घोडके ( वय १८ वर्ष ) या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिघेजण खदानीत पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस व तहसील प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य करुन तिघांनाही बाहेर काढून दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच खदान व दवाखाना परिसरातील मोठी गर्दी झाली होती. या घटनेने केज तालुका शोकसागरात बुडाला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.