Beed-व्यापाऱ्याची मोठी रक्कम लुटली; घटनास्थळी बीड एलसीबी दाखल
लोकगर्जनान्यूज
वडवणी : केज येथून विकलेल्या कापसाची रक्कम घेऊन येताना अज्ञात चोरट्यांनी दुचाकीला वाहन आडवं लावून लुटण्याची घटना बुधवारी ( दि. ७ ) सायंकाळच्या सुमारास वडवणी पोलीस ठाणे हद्दीत घडली. पळविलेली रक्कम ५० ते ५५ लाख असल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच बीड एलसीबी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
घाटसावळी ( ता. बीड ) येथील लांडे नामक व्यक्ती ( पुर्ण नाव समजु शकले नाही ) कापसाचा व्यापार करतात. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस केज येथील एका जिनिंगला विकतात. बुधवारी लांडे हे कापूस विकलेली रक्कम घेऊन दुचाकीवरुन धारुर,वडवणी मार्गे घाटसावळीकडे येत होते. ते वडवणी पोलीस ठाणे हद्दीत आले असता अज्ञात चार ते पाच जणांनी दुचाकीला वाहन आडवं लावून व्यापाऱ्याची दुचाकी अडवून धमकावत रोख रक्कम पळवली. मोठी रक्कम लुटल्याची घटना माहित होताच एलसीबी पथकाने धाव घेतली असून चोरट्यांचा शोध सुरू केला. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.