Beed- वीज अंगावर कोसळून महिला ठार
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : शेतात काम करताना पाऊस आल्याने सागाच्या झाडाखाली थांबलेल्या महिलेच्या अंगावर वीज कोसळून ठार झाल्याची घटना सोनिमोहा ( ता. धारुर ) येथे आज शुक्रवारी ( दि. २९ ) दुपारी घडली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संगीता मच्छिंद्र कराड ( वय ४८ वर्ष ) रा. डुकडेगाव ( ता. वडवणी ) हल्ली मुक्काम सोनिमोहा ( ता. धारुर ) असे मयत महिलेचे नाव आहे. मच्छिंद्र कराड हे मागील काही वर्षांपासून सोनिमोहा येथे स्थायिक झाले असून त्यांनी धुनकवड पाटी जवळ दीड एकर शेती घेतली आहे. याच शेतात मच्छिंद्र हे जनावरे चारत होते तर त्यांच्या पत्नी संगीता या शेतात काम करत होते. आज शुक्रवारी दुपारी या भागात वीजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. पाऊस आल्याने ससंगीता कराड या बाजुलाच असलेल्या साग ( सागवान ) च्या झाडाखाली थांबल्या होत्या. यावेळी कडकडाट कर वीज या झाडावर कोसळली या वीजेचा जोरदार धक्का लागून शेतकरी महिला संगीता मच्छिंद्र कराड या ठार झाल्याची घटना घडली. ही बातमी कळाताच गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत संगीता कराड यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.