Beed-पंधरा हजारांची लाच स्वीकारली पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणात लाच मागणारा आणि घेणाऱ्यासह प्रोत्साहन देणाऱ्यावरही कारवाई
लोकगर्जनान्यूज
बीड : गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने १५ हजार लाचेची मागणी केली. ती एका खाजगी इसमाच्या हस्ते स्वीकारताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी तलवडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात लाच मागणारा पोलीस कर्मचारी अन् घेणार खाजगी इसमासोबत प्रोत्साहन देणाऱ्यालाही ACB ने सोडले नाही. त्यावरही कारवाई केल्याने आता लाच प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तलवडा पोलीस ठाणे हद्दीत दोघा भावात भांडणे झाली. या भांडणाचे गाऱ्हाणे पोलीसांपर्यंत गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करुनये म्हणजे तक्रारदार भाऊ ठाण्यात गेला. त्यास लाचखोर पोलीस हवालदार हरीभाऊ महादेव बांगर ( रा. पालवन चौक,बीड ) याने १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. ती एका खाजगी इसमाकडे देण्यास सांगितली. यात तिसऱ्या एक व्यक्तीने लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. ठरल्याप्रमाणे १५ हजार रुपये लाच खाजगी इसम बुद्धभूषण तुळशीराम वक्ते याच्याकडे देण्यात आली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ,बीड ( ACB ) पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तलवडा पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस हवालदार हरीभाऊ महादेव बांगर ( रा. पालवन चौक,बीड ) , खाजगी इसम बुद्धभूषण तुळशीराम वक्ते ( वय २९ वर्ष ) रा. जातेगाव ( ता. गेवराई ) , तात्याभाऊ दिगंबर कुचेकर ( वय ३६ वर्ष ) रा. जातेगाव ( ता. गेवराई ) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रोत्साहन आणि मध्यस्थी करणाऱ्यांना चाप बसणार?
लोकांना फक्त लाच मागणारे आणि घेणारेच गुन्हेगार वाटतात. परंतु यासाठी प्रोत्साहन देणारे, मध्यस्थी करणारेही गुन्हेगार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले. या लोकांमुळेच लाचखोरी वाढत असून, प्रोत्साहन देणाऱ्यावरही या प्रकरणात कायदेशीर कारवाई झाल्याने लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणारे मध्यस्थी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकाराला काहीअंशी चाप बसेल आणि लाचेच्या घटना कमी होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.