Beed-धक्कादायक घटना! मुलाची मारेकरी निघाली आईच
लोकगर्जनान्यूज
बीड : शहरातील दाऊदपूरा भागात १४ वर्षाचा मुलाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी पेठ बीड पोलीसांनी कसून चौकशी करत अखेर गुन्ह्याची उकल करुन संशयित आरोपी निष्पन्न केला असून आरोपीचे नाव ऐकून धक्काच बसला. पोटच्या गोळ्याचा आईनेच खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीसांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आईवर खूनाचा गुन्हा दाखल केला.
२५ जानेवारी २०२४ दुपारी शेख इजान तैवर ( वय १४ वर्ष ) रा. दाऊदपूरा,बीड याचा घरातच संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन मृतदेहाची उत्तरीय तपासणी जिल्हा रुग्णालयात केली. याचा व्हिसेरा मात्र राखीव ठेवण्यात आला. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार असल्याचं संशय आल्याने पोलीसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. अनेक सीसीटीव्ही तपासले, अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. परंतु काहीच निष्पन्न होत नव्हते. तपासा दरम्यान मयत मुलाच्या आईवर संशय आल्याने तपास सुरू केला असता आईनेच मुलाचे नाक,तोंड,मान दाबून खून केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मयताच्या आई शेख नाझीया शेख तैवर याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सध्या फरार असून पोलीस शोध घेत आहेत. तब्बल ४० दिवसानंतर या घटनेची उकल करुन आरोपी निष्पन्न करण्यात पोलीसांना यश आले.