Beed-टिप्पर खाली चिरडून दोन तरुण ठार
बिंदुसरा प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम सुरू असतानाची घटना
लोकगर्जनान्यूज
बीड : पाली शिवारात रात्री खोदकाम सुरू होते. यावेळी टिप्पर भरल्यावर चालकाने घेऊन जाताना लक्ष न दिल्याने तो सरळ झोपलेल्या जेसीबी ऑपरेटरच्या अंगावर चढला. यातून चिरडून दोघेही जागीच ठार झाले. ही घटना निदर्शनास येताच सर्व यंत्रणा तेथून हलविण्यात आली. रविवार सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर बीड ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहेत.
समाधान बाळू थोरात ( वय २३ वर्ष ) रा. सावरगाव, बीड, सुभाष चव्हाण ( वय ३५ वर्ष ) रा. बिहार अशी मयतांची नावं असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघेही एका जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात अशी माहिती मिळाली. शनिवारी रात्री पाली शिवारातील बिंदुसरा प्रकल्पात खोदकाम सुरू होते. येथे जेसीबी आणि काही टिप्पर सुरू होते. मध्यरात्री वरील मयत हे जेसीबीच्या जवळ झोपवले होते. इतरांचे खोदकाम सुरू होते. यावेळी टिप्पर भरल्यानंतर घेऊन जाताना चालकाने लक्ष न दिल्याने झोपलेल्या या दोघांवर टिप्पर चढला. यात चिरडून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रात्री अंधारात ही घटना कोणाच्याच लक्षात आली नाही. परंतु पहाटेच्या सुमारास थोडासा प्रकाश पडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. यानंतर येथील सर्वच यंत्रणा हलवून उपस्थितांनी पळ काढला असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी बीड ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली अन् घटनास्थळाचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली. यावेळी मयताच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने मन हेलावून टाकले. हे टिप्पर आणि जेसीबी नेमकी कोणाची आहे? तेथून गाळ काढण्याचे काम सुरू होते की, मुरुम याचा तपास पोलीस करत आहेत. परंतु एका चुकीमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.