Beed-खळबळजनक! पोलीस अधीक्षक ( SP ) पथक प्रमुखांच्या अंगावर गाडी घातली
सपोनि गणेश मुंडे सह एक पोलीस कर्मचारी जखमी
लोकगर्जनान्यूज
बीड : गेवराई तालुक्यात पोलीस अधीक्षक ( sp ) यांचे पथक गस्तीवर असताना एक संशयित वाहन दिसल्याने त्यास हात करुन थांबविण्याचा प्रयत्न केला. सदरील वाहन चालकाने चक्क वाहन अंगावर घातलं परंतु प्रसंगावधान राखून बाजूला सरकल्याने मोठा अनर्थ टळला. धडक बसल्याने पथक प्रमुख सपोनि गणेश मुंडे व कर्मचारी वायबसे हे दोघे जखमी झाले. सदरील वाहन हे वाळू माफियाचे होते असे वृत्त असून या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक ( sp ) पथक प्रमुख सपोनि गणेश मुंडे यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे वाळू माफियांमध्ये गणेश मुंडे यांची दहशत निर्माण झाली. आज बुधवारी ( दि. ११ ) पहाटे सदरील पथक गेवराई तालुक्यात गस्तीवर होतं. प्रथम म्हाळसपिंपळगाव येथे पाहणी करुन सपोनि गणेश मुंडे हे कर्मचाऱ्यांसह राक्षसभुवन कडे जात होते. यावेळी गणेश मुंडे यांचे लोकेशन घेण्यासाठी विना नंबरची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ राक्षसभुवन फाट्यावर उभी होती. स्कॉर्पिओ पाहून गणेश मुंडे यांना संशय आल्याने त्यांनी सदरील वाहन चालकाला चौकशीसाठी हात करुन वाहन थांबविण्यास सांगितले परंतु त्याने वाहन न थांबविता चक्क अंगावर वाहन घातले परंतु प्रसंगावधान राखून पोलीस अधिकारी, कर्मचारी बाजुला झाल्याने मोठा अनर्थ टळला. पण धडक लागून पथक प्रमुख सपोनि गणेश मुंडे यांच्या पायाला व हाताला जबर मार लागला असून वायबसे नामक पोलीस कर्मचारी असे दोघे जखमी आहेत. जखमींना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदरील आरोपीला ताब्यात घेतल्याचे सांगितले जात असून, वाळू माफिया आता पोलीसांवर चाल करु लागल्याने त्यांच्यात ही हिंमत येते कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.