Beed-एक कोटी लाचेची मागणी, पोलीस निरिक्षकसाठी लाच स्वीकारताना व्यापारी एसीबीच्या जाळ्यात
आर्थिक गुन्हेशाखेचा पोलीस निरीक्षक अन् कर्मचारी फरार
लोकगर्जनान्यूज
बीड : जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात आरोपी न करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने तब्बल १ कोटी लाचेची मागणी केली. १० लाख आधीच घेऊन तीस लाख की, ५ लाख रुपये शहरातील सुभाष रोडवरील एका कापड दुकानदाराकडे देण्याचे सांगितले, या दुकानदाराने रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने व्यापाऱ्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी आणि व्यापारी असे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
बीड जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेट मध्ये लोकांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. आयुष्यभराची कमाई अडकून पडल्याने अनेकजण देशोधडीला लागले आहेत. या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणार की, नाही? हा गहन प्रश्न आहे. प्रशासन ठेवीदारांऐवजी मल्टीस्टेट चालकांना सहकार्य करतय का? असा संशय व्यक्त केला जातो त्यावर बीड येथे बुधवारी ( दि. १५ ) रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने शिक्कामोर्तब झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शहरातील जिजाऊ मल्टीस्टेटवर पोलीसात गुन्हा दाखल असून, याचा तपास बीड आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. परंतु त्याचा तपास काय झाला? लोकांचे येथे अडकलेले जवळपास २०० कोटींच्या ठेवी परत मिळणार की, नाही? याची तर काही माहिती मिळाली नाही व तो फरार आरोपीही अद्याप मिळाला नाही. परंतु याच मल्टीस्टेट मधून दोन व्यापाऱ्यांच्या खात्यावर मोठी रक्कम वर्ग झालेली आहे. सदरील रक्कम ही त्या व्यापाऱ्यांची उधारीत जमा करण्यात आलेली असल्याचा दावा आहे. चौकशीत ही बाब समोर आल्याने प्रकरणी दोघांना आरोपी न करता सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने तब्बल १ कोटींची लाच मागितली, यातील १० लाख रुपये आधीच घेतले असून, ३० लाख रुपये सुभाष रोडवरील या कपड्यांच्या दुकानदाराकडे देण्याचा निरोप दिला. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याची चौकशी करुन बुधवारी ( दि. १५ ) सापळा लावून खाजगी इसमाला ३० लाख घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक हरीभाऊ खाडे, प्रोत्साहन देणारा पोलीस हवालदार आर.बी. जाधव आणि खाजगी व्यापारी कौशल प्रवीण जैन या तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने बीड पोलीस दलात खळबळ उडाली असून, ठेविदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जर कोटी-कोटी लाचेची मागणी अन् ती दिली जात असेलतर ठेवी परत मिळणार की, नाही? चिंता लागली आहे.