BEED-भीषण अपघात;ट्रॅक्टरचे दोन तुकडे तर कार चक्काचूर: दोन ठार तीन गंभीर
एकाला वाचवण्यासाठी जाताना माय व मुलगा प्राणाला मुकले

लोकगर्जनान्यूज
बीड : ट्रॅक्टर व कारची धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात आई व मुलगा ठार झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री बीड-तेलगाव रस्त्यावर पोखरी शिवारात घडली आहे. एकाने विषारी द्रव्ये प्राशन केल्याने त्यास घाईघाईने उपचारासाठी बीड येथे घेऊन येताना काळाने झडप घातली असून एका वाचविण्यासाठी प्रयत्न करताना दोघांना प्राणाला मुकावे लागले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत व जखमी वडवणी तालुक्यातील आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील उपळी येथील नितीन सुभाष वेताळ यांनी सोमवारी ( दि. १८ ) रात्री विषारी द्रव्ये प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच त्यास स्विफ्ट कार क्र. MH 02 BG 9391 मध्ये उपचारासाठी बीडला घेऊन येत होते. दरम्यान कार मैंदा व घाटसावळीच्या मध्ये पोखरी शिवारात आली असता ऊस घेऊन आलेल्या ट्रॅक्टर व या कारची धडक होऊन घडलेल्या अपघातात रत्नमाला केशव पवार ( वय ४१ वर्ष ) , प्रदीप केशव पवार ( वय २४ वर्ष ) दोघे रहाणार उपळी ता. वडवणी या दोघा माय-लेकाचा मृत्यू झाला. नितीन सुभाष वेताळ, अनुसया सुभाष वेताळ, प्रमोद देविदास चव्हाण हे तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण आहे की, ट्रॅक्टरचे हेड तुटून दोन तुकडे झाले तर कार चक्काचूर होऊन रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन पडली. जखमींवर बीड येथे दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेने उपळी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.