Beed-बीड जिल्ह्यात 180 ग्रामपंचायतीचा धुराळा; प्रोग्राम घोषीत तर आचारसंहिता सुरू

लोकगर्जनान्यूज
बीड : जानेवारी ते डिसेंबर 2023 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर शासनाने प्रशासक नेमले होते. यामुळे निवडणूका कधी लागणार याकडे गाव कारभारी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी ग्रामपंचायत निवडणूकीची घोषणा केली. राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतीचे तर बीड जिल्ह्यातील 180 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा धुराळा उडणार आहे. 5 नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने उमेदवारांच्या हाती अवघा एक महिना शिल्लक आहे.
राज्यातील 2 हजार 369 तर बीड जिल्ह्यातील 180 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपून 9 महिने संपले आहेत. मागील या प्रदिर्घ काळापासून प्रशासक कारभार हाकत आहेत. यामुळे काही ठिकाणी फायदा तर अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची चर्चा आहे. प्रशासकाच्या काळात काय घडलं, कुठं बिघडलं, कुठं सुधारलं? ही लोकांची चर्चा परंतु ग्रामपंचायत सरपंच, सदस्य होण्यासाठी इच्छुकांची निवडणूक कधी लागणार याची प्रतिक्षा. प्रशासक येऊन ९ महिने झाले, प्रभाग रचना, प्रभाग निहाय आरक्षण, मतदार यादी प्रसिद्ध असे सर्वच कामे झाल्याने निवडणूक आयोग कधीही निवडणूक घोषित करेल याची पुरेपूर जाणीव होती. परंतु वेळ लागतं असल्याने लोकांमध्ये रहाण्यासाठी होणारा खर्च खिशाला जड होत होता. यामुळे लवकर निवडणूक घोषित व्हावी यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते. अखेर मंगळवारी ( दि. ३ ) निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी घोषणा केली आहे. यामध्ये राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तर 130 सरपंच पदासाठी तसेच 2 हजार 950 सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक घोषीत केली. या निवडणूक असलेल्या गावात मंगळवार ( दि. ३ ) पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली. सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी अवघा एक महिना गावकारभाऱ्यांच्या हाती आहे. यामुळे सोंग जास्त अन् रात्र लहान अशी अवस्था गाव पुढाऱ्यांची झाली.
असा आहे निवडणूक प्रोग्राम
1) तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक :- शुक्रवार 6 आक्टोबर 2023
2) नामनिर्देशन पत्र दाखल करणे :- दि. 16 ते 20 आक्टोबर 2023 वेळ सकाळी 11 ते 03 पर्यंत
3) नामनिर्देशन पत्र छाननी:- दि. 23 आक्टोबर 2023 सकाळी 11 ते छाननी संपेपर्यंत
4 ) नामनिर्देशन पत्र मागे घेणे :- दि. 25 ऑक्टोबर 2023 दुपारी 3 वाजेपर्यंत
5) उमेदवार यादी प्रसिद्ध करणे तसेच चिन्ह वाटप :- दि. 25 ऑक्टोबर दुपारी 3 च्या नंतर
6) मतदान:- 5 नोव्हेंबर सकाळी 7:30 ते सायं 5:30
7) मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक ( मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) :- दि. 6 नोव्हेंबर 2023 व नक्षलग्रस्त तसेच दुर्गम भागासाठी दि. 7 नोव्हेंबर 2023
8) जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दि. 9 नोव्हेंबर 2023 असा आहे.