Beed- गोपीनाथ मुंडे विमा योजनेतून जिल्ह्यातील 49 शेतकऱ्यांना मिळणार 98 लाख

लोकगर्जनान्यूज
बीड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील अपघातग्रस्त 49 शेतकऱ्यांना 98 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यासाठी खंडित विमा दावे निकाली काढले जात असल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 8 एप्रिल 2021 ते 6 एप्रिल 2022 या कालावधीत राबविण्यात आली. काही अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव ही योजना पुढील वर्षात निर्धारित वेळेत सुरू होऊ शकली नव्हती. 6 एप्रिल 2022 पासून ही विमा योजना बंद आहे. यामुळे अनेक प्रस्ताव सादर करता आले नाहीत. दरम्यान 7 एप्रिल ते 22 ऑगस्ट 2022 असा ऐकून 138 दिवसांचा कालावधी हा खंडित कालावधी घोषित करून या कालावधीमधील प्राप्त होणारे शेतकऱ्यांचे विमा दावे निकाली काढण्यास विशेष बाब म्हणून कृषी आयुक्तालयाने परवानगी देत अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने मागवले होते तसेच 23 ऑगस्ट ते 13 एप्रिल 2023 या कालावधीत खंडित प्रकरणे सुद्धा प्राप्त झाली. शेतकऱ्यांनी प्रस्तावित केलेले दावे कृषी आयुक्तालयास पाठवून निधीची मागणी करण्यात आली. त्यानुसार 39 व 10 अशा एकूण 49 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधळ-मुंडे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी विशेष प्रयत्न केले.