Asp पंकज कुमावतांना वाहन चोरांचे उघड आव्हान!
लवाजम्यासह दिवसभर आडसमध्ये सर्च मोहीम अन् रात्री वाहन चोरीला

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथे चोरीच्या दुचाकी शोधण्यासाठी Asp पंकज कुमावत यांनी शनिवारी ( दि. ८ ) लवाजम्यासह दिवसभर सर्च ( Search ) मोहिम राबवून कागदपत्रे पाहून दुचाकी सोडल्या तर काही धारुर पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. परंतु याच रात्री येथून एक वाहन चोरीला गेले असल्याचे आज रविवारी सकाळी उघडकीस आले. आपल्या कामातून वेगळा दरारा निर्माण करणारा अधिकारी म्हणून कुमावत यांनी ओळख निर्माण केली. ते दिवसभर ज्या गावात वाहन चोरांना उघडं पाडण्यासाठी रस्त्यावर उतरले तिथेच चोरट्यांनी वाहन चोरुन पंकज कुमावत यांना आव्हान दिले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापुर्वी आडस येथील एकाही चोरीचा तपास लागलेला नाही याचा तरी लागेल का? असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत.
धारुर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या आडस येथून अंबाजोगाई रस्त्यावरील वयराट कॉम्प्लेक्स समोर उभे केलेले अशोक लेलँड दोस्त ( छोटा हत्ती ) क्रमांक MH 02 CE 2054 हे वाहन अज्ञात चोरट्यांनी शनिवार-रविवार च्या मध्यरात्री अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास चोरुन नेले आहे. सकाळी वाहन सदरील ठिकाणी न दिसल्याने शोधाशोध केली परंतु वाहन कुठेही आढळून आले नाही. त्यामुळे वाहन धारक अशोक आकुसकर हे तक्रार देण्यासाठी धारुर पोलीस ठाण्यात पोचले आहेत. आताच कसंबसं करुन वाहन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असताना चोरट्यांनी वाहन चोरून नेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच आडस येथे चोरीच्या घटना नेहमीच घडतात परंतु अद्याप पर्यंत एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही. या गरीब मुलांच्या वाहन चोरीचा तरी तपास लावावं अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
पंकज कुमावतांना हे उघड आव्हान!
केज उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार असलेले आयपीएस ( IPS ) पंकज कुमावत यांनी बीड जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई करत दोन नंबर वाल्यांना सळोकी पळो करून सोडले आहे. आपल्या कामातून वेगळा ठसा निर्माण केला. परंतु त्यांच्याच हद्दीतील जानेगाव येथे चोरीच्या १८ दुचाकी व आरोपी सापडले आहेत. हे पाहता हद्दीत असे आणखी काही वाहने सापडतात का म्हणून शनिवारी ( दि. ८ ) सकाळी धारुर येथे दुचाकी सर्च मोहीम राबवली. यानंतर आडस येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ११ ते ४:३० वाजेपर्यंत सर्च मोहीम राबवून, अनेक दुचाकी चौकात लावून कागदपत्रे पाहिल्या शिवाय सोडली नाही. दिवसभरात काही दुचाकींची कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने ती धारुर पोलीस ठाण्यात नेऊन लावली आहेत. कागदपत्रे दाखवून आपापली वाहने घेऊन जावे असे सांगितले आहे. मोठा लवाजम्यासह जवळपास दिवसभर ही मोहीम सुरू होती. अनेकांनी चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस पाहून भीतीने बाजार न करता गावाकडे परतनं पसंत केले. ज्यांना या कारवाईतून उघड पाडण्यासाठी पंकज कुमावत स्वतः मोठा लवाजमा घेऊन रस्त्यावर उतरून दिवसभर कारवाई केली. त्याच गावात त्याच रात्री वाहन चोरीची घटना घडली. यामुळे वाहन चोरांचे पंकज कुमावत यांना आव्हान आहे का? की, सामान्यांना भीती दाखवणाऱ्या पोलीस प्रशासनाचा चोरट्यांना धाक दिसत नाही. अशी चर्चा सर्वसामान्य नागरिक करत आहेत.