पीक विमा: पदयात्रा काढून तहसीलदार यांना निवेदन सादर
सर्व गप्प असताना आडसचा शिवरुद्र आला मदतीला धावून

लोकगर्जनान्यूज
केज : शेतकऱ्यांना अनुदान नाही की, पीक विमा नाही. यावर कोणीच बोलण्यास तयार नाही. अशा वेळी आडस येथील सामाजिक कार्यकर्ता शिवरुद्र आकुसकर हा मदतीला धावून आला. हजारो शेतकऱ्यांचे पीक विमा संबंधी वैयक्तिक अर्ज घेऊन आडस ते केज पदयात्रा काढून तहसीलदार यांना सादर केले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार दुल्हाजी मेंडके यांनी स्वीकारले. तब्बल २५ कि.मी. पायी जाऊन अर्ज सादर केल्याने कौतुक करण्यात येत आहे.
शेतमालाला कवडीमोल दर, निसर्गाचा लहरीपणा, वीजेचा लंपडाव यासह अनेक संकटं शेतकऱ्यांसमोर आहेत. ऐन वेळी काही कारणाने पीकांचे नुकसान झाले तरी ते भरून निघावे म्हणून शेतकरी पिकांचा विमा काढतो. परंतु नुकसान झाल्यानंतर ७२ तासात क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून ऑनलाईन तक्रार करणे, फोटो काढून पाठवणे, ऐनवेळी वीमा कंपनीची साइड चालत नाही तेही शेतकऱ्यांची चूक यासह आदि जटील अटी आहेत. क्लेम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एकप्रकारे अग्नी परीक्षा पास करावी लागते असे चित्र आहे. या अटीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळत नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे खरीप २०२२ विम्याचे आहे. सुरवातीला पावसाने खंड दिल्यानं पिकांचे नुकसान झाले. यानंतर काढणीला पीक आल्यानंतर अतिवृष्टीने हिरावून नेले. जेंव्हा या नुकसानीच्या तक्रारी करायच्या तेव्हांच विमा कंपनीची साइड चालत नव्हती यामुळे तक्रारी करता आल्या नाही. पिकांचे नुकसान झालेले जग जाहीर आहे परंतु तक्रार नाही म्हणून ८० टक्के शेतकरी पीक विम्याला मुकले आहेत. यावर कोणीच बोलण्यास तयार नाही. ‘आईची कळ दायीला नसते ‘ याप्रमाणे आडस येथील सामान्य शेतकरी तरुण शिवरुद्र आकुसकर हे पुढे आले. त्यांनी सोशल मीडियावर मेसेज टाकत व स्वतः तक्रारी अर्ज मोफत वाटून पीक विमा मिळाला का नाही? याबाबत वैयक्तिक तक्रारी अर्ज गोळा केले. हे ३ हजार ते साडेतीन हजार अर्ज घेऊन आडस येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून कळमअंबा,चंदन सावरगाव, कुंबेफळ केज अशी पदयात्रा काढून दुपारी दोनच्या सुमारास तहसीलदार कार्यालय येथे पोचले. येथे तहसीलदार दुल्हाजी मेंडके यांनी अर्ज व निवेदन स्वीकारले. याबाबत जिल्हाधिकारी व शासनास तातडीने मागण्या कळविण्यात येतील तसेच पुढील आठवड्यात वीमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून यावर चर्चा करुन यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करु असे आश्वासन दिले. या पदयात्रेत सरपंच बालासाहेब ढोले, अंगद पाटील( मा. उपसरपंच ), संतोष म्हेत्रे, रामदास साबळे, शाम आकुसकर, शशिकांत इंगळे( सरपंच कळमअंबा ), अश्विन टोम्पे,. हनुमंत सौदागर, विष्णू थोरात ( कुंबेफळ ), भुजंग इंगोले, मुद्दसीर शेख, अकीद पठाण, वैजनाथ आकुसकर, पुरुषोत्तम तागड, गणेश कोठे, नितीन राजमाने, सविता आकुसकर यांच्यसह आदी सहभागी झाले होते.