600 रु. ब्रास वाळू डेपो टेंडरला यावर्षी तरी प्रतिसाद मिळणार का?

लोकगर्जनान्यूज
बीड : लोकांना घर बांधण्यासाठी कमी किंमतीत वाळू मिफावी, वाळूचा अवैध गोरखधंदा बंद व्हावा यासाठी जिल्हा प्रशासानाने वाळू उत्खनन करुन वाळू डेपोसाठी ऑनलाईन पद्धतीने टेंडर काढले आहे. 1 ते 18 मार्च या कालावधीत टेंडर स्वीकारले जाणार असून 20 मार्च रोजी प्राप्त निविदा उघडल्या जाणार आहेत. मागच्या वर्षी तीन वेळा टेंडर काढूनही केवळ एकच ठिकाणी वाळू डेपोसाठी दिला गेला होता. यंदा किती ठिकाणच्या वाळू डोपासाठी निविदा प्राप्त होतात व किती निविदांना मंजूरी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गेल्यावर्षी अल्प प्रतिसाद मिळाला होता.
2023 मध्ये राज्य शासानाने सर्व सामान्यांना कमी दरात वाळू मिळावी यासाठी प्रति ब्रास सहाशे रुपयांचा भाव निश्चित केला. त्यानुसार वाळू डेपोसाठी टेंडर मागण्यात आले होते. पहिल्या व दुसर्या टप्प्यात वाळू डेपोला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा तिसर्यांदा वाळू टेंडर काढण्यात आले. शासन निर्णयानुसार 2023 मध्ये वाळू उत्खनन करुन डेपोपर्यंत नेण्यासाठीचा जो खर्च होतो तो जिल्हा प्रशासनाने दिला . यामुळे सर्व सामान्यांना 600 रुपये ब्रासने वाळू मिळाली. परंतू यंदा नियमात बदल करण्यात आला असून सहाशे रुपये ब्रास व टेंडरसाठी मंजूर होणारा प्रति ब्रासचा खर्च ग्राहकांच्या खिशामधुन घेतला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जवळपास दोन हजार रुपये ब्रासने वाळू मिळणार आहे. तसेच ग्राहकांनी विकत घेतलेली वाळू डेपोपासून घरापर्यंत आणण्यासाठी वाहन भाडे वेगळे द्यावे लागणार आहे. एकंदरीत मागच्या वेळेपेक्षा अधिक दराने वाळू खरेदी करावी लागणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील नदीपात्र व पाणीसाठा क्षेत्रामधील गाळमिश्रीत वाळू उत्खनन करुन या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक करण्यासाठी व डेपो निर्मिती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वाळू डेपोसाठी टेंडर काढण्यात आले आहे. यासाठी किती जणांनी टेंडर भरले असून ते २० मार्चला समजणार आहे.