22 गावांच्या रक्षणासाठी दोन कर्मचारी आडस चौकी हद्दीत पोलीसांचा धाकच राहिला नाही
अनेक अवैध धंदे राजरोस सुरू;चार दिवसांत दोन खून

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथे धारुर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस दूर क्षेत्र आहे. येथे सात कर्मचारी अन् एक अधिकारी असे पदे आहेत. परंतु दोन कर्मचाऱ्यांवर कारभार हाकला जात असल्याने चौकी हद्दीत अनेक अवैध धंदे व वाढती गुन्हेगारी तसेच चार दिवसांत दोन खून सारखा गंभीर गुन्हा घडल्याने येथे पोलीसांचा धाकच उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येथे कर्मचारी वाढविण्यासाठी आणखी किती गुन्हे घडण्याची वाट पाहिली जात आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
धारुर पोलीस ठाणे हद्दीतील धारुर नंतर सर्वात मोठं व बाजारपेठेचे गाव म्हणून आडसकडे पाहिलं जातं. येथे तातडीने पोलीस मदत मिळावी, गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन गुन्हेगारीचा बीमोड व्हावं म्हणून येथे पोलीस दूर क्षेत्र ( चौकी ) सुरू करण्यात आली. परंतु या चौकीला रिक्त पदांचे लागलेलं ग्रहण काही सुटण्याचे नाव घेत नाही. चाळीस वर्षांच्या या चौकीला सुरवाती पासून केवळ दोन कर्मचारी नियुक्त असतात. स्थापनेपासून ते आजपर्यंत ही परंपरा कायम आहे. या चौकीच्या हद्दीत एकूण २२ गावे येतात. या गावातील हजारो नागरिकांचे रक्षण केवळ दोन कर्मचारी करतात तेही दिवसाचं, अनेक चोरीच्या घटना घडूनही येथे पोलीस कर्मचारी मुक्कामी थांबत नाही की, येथे रात्रीची गस्त नाही. कर्मचारी कमी असल्याने त्यांना कोणतीही कारवाई करता येत नाही. परिसरातील गावांना भेटी देता येत नाही.त्यामुळे चौकीच्या हद्दीत अवैध दारू विक्री, पत्त्याचे क्लब, गांजा विक्री, मटका असे अनेक अवैध धंद्यांना ऊत आला. शांत असलेला हा परिसर आता अशांती कडे प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे शनिवारी आडस येथे खूनाची घटना घडली याबाबत लोकं हळहळ व्यक्त करत असताना केंद्रेवाडी येथेही खून झाला. अवघ्या चार दिवसांत खून सारख्या दोन गंभीर घटना घडल्याने हा परिसर पुर्ण हादरुन गेला. हे पहाता वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथे नियमानुसार सर्व पदांवर कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली जात आहे.
आतापर्यंत एकाही चोरीचा तपास नाही
आडस पोलीस चौकी हद्दीत अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. आडस येथे तर चार-सहा महिन्याला चोरीची घटना घडतेच. परंतु आतापर्यंत येथील चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असे ऐकिवात नाही. जवळपास दोन महिन्यांपूर्वी येथून एक अशोक लिलेंड कंपनीचा माल वाहू वान चोरीला गेला आहे. त्या वाहनाचाही तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही. याचे कारण अपुरे कर्मचारी असु शकते का?असा प्रश्न निर्माण होतो आहे.
नियुक्त कर्मचारी कागदावरच असतात
येथील पोलीस चौकीला मागे पाच कर्मचारी व एक अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. परंतु त्यांना नियमित धारुर येथे ठाण्यात बोलावून घेतले जात असल्याने त्यांची नियुक्ती केवळ कागदावरच होती असा अनुभव आहे.त्यामुळे २४ तास आडस चौकी साठी नियुक्ती द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पोलीस चौकी की, सल्ला केंद्र
येथील पोलीस दूर क्षेत्र ( चौकी ) असूनही अनेक लोकं येथे तक्रारी घेऊन येतात. ते आले की, चौकीला कुलुप असते. अन् कधी चूकून चौकी उघडी असलीतरी येथील कर्मचारी त्या तक्रारदाराला धारुर येथे ठाण्याला जाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे चौकी म्हणजे सल्ला केंद्र असतो का? असा प्रश्न तक्रारदारांना पडला आहे. याकडेही वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.