३०२ च्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद; केज पोलीसांची कामगिरी

केज : बीड तालुक्यातील सफेपूर येथील बाळासाहेब सोपान घोडके वय (४० वर्ष) याचा मृतदेह केज येथील शिक्षक कॉलनीतील जिवराज हांगेच्या इमारतीच्या खोलीत आढळून आला होता. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोघां भावा विरोधात गुन्हा दाखल आहे. तेव्हा पासून आरोपी असलेले दोघेही भाऊ फरार झाले. त्यातील एकास आज केज पोलीसांनी ताब्यात घेतले.
याप्रकरणी मयताची पत्नी मीरा घोडके यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात शिरपुरा ता. केज येथील मुकादम जिवराज केशव हांगे व बाबुराव केशव हांगे या दोन भावा विरोधात गु.र.नं .५३३/२०२१ भा.दं.वि. ३०२, ३६५, ३४२ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच जिवराज हंगे व बाबुराव हंगे हे दोघे भाऊ फरार झाले. पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी मागावर होते. परंतु ते पोलीसांना गुंगारा देऊन फिरत होते. अखेर दि.३० डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी ११:०० वा. आरोपीमुकादम जिवराज केशव हंगे हा केज येथून कळंब रोडने दुचाकी वरून जात असल्याची गुप्त माहिती केज ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, गुन्हे अन्वेषण विभागाचे दिलीप गित्ते, सहाय्यक फौजदार महादेव गुजर, महादेव बहीरवाळ यांना सोबत घेऊन आरोपी जिवराज केशव हंगे याचा पाठलाग केला. त्याला चिंचोली फाट्यावर मोठ्या शिताफीने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी जिवराज हंगे याला २ जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरा आरोपीही फरार असून त्याचाही शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी दिली.