ह्रदयद्रावक! मुला पाठोपाठ आठ दिवसात वडीलांचीही आत्महत्या
लोकगर्जना न्यूज
धारुर : येथे एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली आहे. या पाठोपाठ सदरील मुलाच्या वडिलांनी ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने धारुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
श्रीकृष्ण मोहन चोले ( वय २७ वर्ष ) रा. आसोला ( ता. धारुर ) या तरुणाने धारुर येथे बसस्थानक परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि. ८ ) घडली आहे. त्यावेळी सदरील तरुणाचे वडील हे पंढरपूर येथे वारीमध्ये गेले होते. त्यांना माहिती मिळताच ते गावी आसोला येथे परत आले. मुलाने आत्महत्या करुन आठच दिवस झाले असून गेल्या शुक्रवारी मुलाने तर या शुक्रवारी वडील मोहन पंढरी चोले ( वय ५० वर्ष ) यांनी कोळपिंपरी शिवारातील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुला पाठोपाठ आठ दिवसातच वडीलांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने धारुर तालुक्यात खळबळ उडाली आहे. मोहन चोले यांनी मुलाच्या विरहातून हे टोकाचे पाऊल उचलले असावं असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच आडस पोलीस चौकीचे जमादार प्रकाश सोळंके यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे. नेमकं आत्महत्येचे कारण पोलीस तपासात स्पष्ट होईल.