ह्रदयद्रावक ! परळी तालुक्यात बाप-लेका सोबत घडली दुर्दैवी घटना
परळी : विहिरीतील पाणी काढताना तोल जाऊन पडल्याने बुडत असलेल्या वडीलांना वाचविण्यासाठी मुलाने विहिरीत उडी घेतली. परंतु बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे आज शुक्रवारी ( दि. १३ ) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. वडिल आणि भाऊ बुडत असल्याने दुसरा मुलगाही विहिरीत उतरला तोही बुडत होता परंतु आईनं प्रसंगावधान दाखवून विहिरीत दावं फेकल्याने त्यास धरुन तो बाहेर आल्याने वाचला परंतु दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेख सादेक, शेख रफीक रा. बरकत नगर ( परळी ) असे मयत बाप-लेकाचे नाव असल्याचे वृत्त आहे. शेख सादेक हे आपल्या कुटुंबासह दादाहरी वडगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते. दरम्यान शेतात गेल्यानंतर विहिरीतील पाणी काढताना तोल गेल्याने सादेख हे विहिरीत पडले. ते बुडत असल्याचे पाहून जवळच असलेला मुलगा रफीक याने वडीलांना वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली परंतु तोही पाण्यात बुडाला. डोळ्या देखत वडील आणि भाऊ बुडत असल्याने दोघांनाही वाचविण्यासाठी दुसरा मुलगा साजिद हा विहिरीत उतरल्याने तो ही बुडत होता. परंतु आईनं बाजुलाच पडलेलं दोर टाकला, त्यास पकडून तो वर आल्याने बाचला परंतु दोघं बाप-लेकांचा मृत्यू झाला. या घटनेने बरकत नगर व दादाहरी वडगाव या दोन्ही ठिकाणी शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीसांनी धाव घेतली आहे. मृतदेह बाहेर काढण्यात येत आहे. पाणी आणण्यासाठी गेलेले बाप-लेक विहिरीत बुडाल्याची बातमी गावात समजताच दादाहरी वडगावात येथील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.