ह्रदयद्रावक घटना! ऊसतोडणी गेलेल्या आई व मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील जिवाचीवाडी येथील ऊसतोड मजुर आपल्या कुटुंबासह उस्मानाबाद जिल्ह्यात गेलेले आहे. या कुटुंबासोबत आज शुक्रवारी ( दि. १८ ) सकाळी दुर्दैवी घटना घडली आहे. पाणी आणण्यासाठी गेलेल्या आई व मुलाचा गबार ( विहीरीत ) बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, संतोष दशरथ घुले रा. जिवाचीवाडी ( ता. केज ) हे ऊसतोड मजूर आपल्या कुटुंबासह उस्मानाबाद जिल्ह्यातील विठ्ठलसाई सा. कारखान्यावर छकडा ( बैलगाडी ) घेऊन ऊस तोडणीसाठी गेले आहेत. आज सकाळी सोनाली संतोष घुले ( वय २४ वर्ष ) मुलगा सोहम ( वय ४ वर्ष ) यास सोबत घेऊन पाणी आणण्यासाठी आई-लेक गेले होते. यावेळी चलत – चलत सोहम हा गबार वजा विहीरीत पडला त्यास वाचविण्यासाठी आई सोनाली यांनी पाण्यात उडी घेतली. दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आई-लेकराला पाण्यातून बाहेर काढले परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने कारखाना परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती गावाकडे कळताच जिवाचीवाडी वर शोककळा पसरली आहे.